नाशिक : शहरामध्ये झालेली विविध विकासकामे ही कॉँग्रेसच्या काळात झाली असून, त्यानंतर आजवर कोणतीही दर्जेदार विकासकामे झाली नाहीत, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. विकासाचे आश्वासन देऊन सत्तेत येणाऱ्यांनी शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी चव्हाण यांची प्रचार सभा वडाळारोड परिसरात रविवारी दुपारी झाली. चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना बँकांच्या रांगेत उभे राहावे लागले. यात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. परंतु काळ्या पैशांवाले कोणीही बँकेच्या रांगेत दिसून आले नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा कष्टाचा पैसा काढून घेण्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय घेतला का? असा सवाल त्यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर बोलताना ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये ‘दारिद्र्य’ असल्याचे त्यांनी म्हटले. महानगरपालिकांचे एलबीटी कर वसुलीचे अधिकार काढून घेतल्याने महानगरपालिकांचे उत्पन्न घटले आहे. वेगवेगळ्या कामांसाठी त्यांना राज्य अथवा केंद्रावर विसंबून रहावे लागत असल्याने राज्यभरात विकासकामांना खीळ बसली असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नाशिकचा विकास कॉँंग्रेसच्या काळातच
By admin | Published: February 20, 2017 12:39 AM