नाशिक : शहराचा विकास आराखडा आणि बांधकाम नियंत्रण नियमावली मंजुरीसंदर्भात नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिलेले आश्वासन न पाळल्याने आणि विकास आराखड्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने हक्कभंग दाखल करणार असल्याचे आमदार जयंत जाधव यांनी सांगितले.नाशिकचा विकास आराखडा राज्य शासनाला सादर करण्यात आला असून, बांधकाम नियंत्रण नियमावलीही सादर करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यास मंजुरी न मिळाल्याने नाशिकमधील विकासकामांवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. त्यामुळे ५ एप्रिल रोजी आमदार जाधव यांनी विधी मंडळाच्या सभागृहात लक्ष्यवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी १५ मेपर्यंत दोन्ही सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्यानुसार कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे विधीमंडळ सदस्याला दिलेल्या आश्वासनांची पूतर्ता न झाल्याने मंगळवारी जयंत जाधव यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. परंतु त्यावरही वेळेत कार्यवाही न झाल्यास हक्कभंग दाखल करण्यात येईल.
विकास आराखडा : हक्कभंग दाखल करणार
By admin | Published: June 22, 2016 11:32 PM