नाशिक - पावसाळ्यात प्लास्टिकमुळे चेंबर्स तुंबून शहर जलमय होण्याच्या प्रकारामुळे महापालिकेने प्लास्टिक विरोधी मोहीम व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. विभागनिहाय मोहीम राबवून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिकची विक्री करणा-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हे दाखल केले जाणार आहेत.प्लॉस्टिक पर्यावरणाला घातक ठरू लागल्याने राज्य सरकारनेही त्याविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिक पिशव्या विक्रीस बंदी असतानाही सर्रासपणे त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. यंदा पावसाळ्यात शहरातील रस्ते जलमय होण्याचे खापर महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्लॉस्टिकवरच फोडले होते. भुयारी गटारींवरील ढापे, चेंबर्स यामध्ये प्लॉस्टिक अडकून रस्त्यांवर पाणी साचल्याचे प्रकार नाशिककरांनी या पावसाळ्यात वारंवार अनुभवले. त्यावेळी आरोग्य विभागाने दोन दिवसात तब्बल ४६ टन प्लॉस्टिक आढळून आल्याचा दावा केला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील सहाही विभागात स्वच्छता निरीक्षकांमार्फत प्लॉस्टिकविरोधी कारवाई करण्यात येते. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक मापनासाठी महापालिकेकडे यापूर्वी ५ ते ६ यंत्रे होती. त्यामुळे ब-याचदा मापनात अडचणी येऊन सरसकट कारवाई केली जात होती. परंतु, आता राज्य शासनच प्लॉस्टिकबंदीबाबत कठोर बनले असताना महापालिकाही सतर्क झाली असून मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी महापालिकेने पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॉस्टिक मापनासाठी ५० यंत्रे खरेदी केली आहेत. प्रत्येक विभागाला ८ यंत्रे दिली जाणार असून त्यामुळे कारवाईला गती प्राप्त होणार असल्याचा दावा आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी केला आहे.दीड लाखांचा दंड वसूलमहापालिकेने एप्रिल २०१७ पासून आतापर्यंत सहाही विभागात प्लॉस्टिकविरोधी मोहीम राबवत ५६० किलो प्लॉस्टिक जप्त केले आहे. या मोहिमेतून १ लाख ६९ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॉस्टिकची विक्री करताना आढळून आल्यास पहिल्यांदा ५ हजार रुपये दंड वसूल केला जातो. पुन्हा विक्री करताना आढळल्यास १० हजार रुपये दंड केला जातो. मात्र, त्यानंतरही विक्री करताना आढळून आल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
प्लास्टिक मायक्रॉन मापनासाठी नाशिक महापालिकेकडून ५० यंत्रांची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 7:06 PM
मोहीम होणार व्यापक : आठ महिन्यात ५५० टन प्लास्टिक जप्त
ठळक मुद्दे पावसाळ्यात प्लास्टिकमुळे चेंबर्स तुंबून शहर जलमय होण्याच्या प्रकारप्लॉस्टिक पिशव्या विक्रीस बंदी असतानाही सर्रासपणे त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी