इंदिरानगर : पाथर्डी गावातील मानपानाच्या सर्व प्रथा बंद करून त्यातून वाचणारा सर्व पैसा गावाच्या विकासासाठी वापरण्याचा निर्णय विविध कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ग्रामस्थांनी घेतला.सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष संजय डेमसे यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली. यावेळी गावातील नगरसेवक सुदाम डेमसे यांनी मांडलेल्या ठरावास संपूर्ण ग्रामस्थांनी एकमताने पाठिंबा दिला. या ठरावात गावात विवाह, धार्मिक कार्यक्रम आणि दु:खात कार्यात संपूर्ण गावाला भेटवस्तू, टोपी, टॉवेल देण्याची प्रथा बंद करून त्यातून वाचणारा पैसा गावाच्या विकासासाठी वापरण्यात येईल तसेच वराची काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात येऊन त्याचा पैसाही गावाच्या विकासासाठी वापरण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. सर्व ग्रामस्थांनी एकमताने ठराव मंजूर करून वेगळा पायंडा पाडला आहे. याप्रसंगी नगरसेवक भगवान दोंदे, उपाध्यक्ष एकनाथ शिरसाठ, सुनील कोथमिरे, तानाजी गवळी, सुदाम जाचक, विष्णू डेमसे, त्र्यंबक कोंबडे, रामदास जाचक, निवृत्ती गवळी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत भरवीरकर यांनी केले.
मानपान प्रथेचा खर्च गावाच्या विकासासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:39 PM