मालेगाव - मनपा आयुक्त दीपक कासार मनमानी कारभार करीत असल्याने विकासकामांना अडथळा निर्माण झालाआहे. मनपा व महासभेत हजर राहत नसल्याने प्रशासकीय कामे देखील खोळंबली आहेत. भ्रष्टाचाराला सहाय्य होईल अशी कामकाजाची पध्दत असल्याने आर्थिक परिस्थितीने गरीब मनपासाठी आयुक्त कासार घातक आहेत. त्यामुळे नगरविकास विभागाने त्यांची त्वरीत बदली करावी अन्यथा अविश्वास ठराव आणावा लागेल, अशी टिका महापौर ताहेरा शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.दरम्यान, राज्यात महाआघाडीचे सरकार असून कृषिमंत्रीपद दादा भुसे यांच्याकडे आहे. आयुक्तांवर अविश्वास आणल्यास अधिकारी मंत्रींचे ऐकत नाही असा चुकीचा संदेश राज्यात जाईल भुसे यांच्याबद्दल आदर असल्यामुळेच ५४ नगरसेवकांनी स्वाक्षरी केली असतांना देखील अविश्वास ठराव मांडण्यात आला नाही. त्यामुळे आयुक्तांची तात्काळ बदली शासनाने केली पाहिजे अन्यथा या संदर्भात लवकरच नगरविकास मंत्री व सचिवांना भेटून निवेदन देत मागणी केली जाईल. त्याची देखील दखल घेतली न गेल्यास अविश्वास ठराव मांडला जाईल, अशी भुमिका महापौर ताहेरा शेख यांनी घेतली आहे आयुक्त कासार हे ज्यांना निलंबीत केले गेले व चौकशी सुरू आहे अशा अधिकाऱ्यास सक्षम उपायुक्तांची पदे सोपवित आहेत हे का झाले हे वेगळे सांगायची गरज नाही. मनपाच्या आर्थिक हितासाठी आयुक्तांच्या बदलीची मागणी करण्यात आली आहे. त्याची दखल शासनास घ्यावी लागेल, असे महापौरांनी पुढे बोलतांना सांगितले.आमदारांतर्फे जनतेची दिशाभुलरस्ते व गटारीची कामे आमदाराची नसतात असे सांगणाऱ्या आ. मौलाना मुफ्ती यांनी गत एक वर्षात शहरात एकही लक्ष्यवेधी काम केलेले नाही. मात्र वर्षपुर्तीचा केक कापत जनता विकासकामाने खुष असल्याचे सांगतात. शहरातील रस्ते, गटारींसह इतर विकासकामे मनपाच्या निधीतून साकारत असतांना या कामांचे श्रेय मौलाना मुफ्ती घेत आहेत. ही शहरातील जनतेची दिशाभुल व विश्वासघात असल्याचा आरोप माजी आ. शेख रशीद यांनी यावेळी बोलतांना केला.शहरातील जुना आग्रारोड, बडी मालेगाव हायस्कुल, द्याने शिवरोड, दरेगाव, मरिमाता, हजारखोली, नुरबाग आदी भागांमध्ये रस्ते व गटारीची कोट्यवधी रूपयांची कामे मनपातर्फे साकारली जात असतांना त्याचे श्रेय घेण्याची आ. मुफ्ती यांची धडपड हास्यास्पद ठरली आहे. अशी टिका करत शेख रशीद पुढे म्हणाले, १२ मीटरच्या आतील रस्ते व मोठी गटार सिमेंट काँक्रीटने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१४ वित्त आयोगाच्या निधीतून वाडिया रूग्णालयाचे नुतनीकरण तर अली अकबरलगत नवीन रूग्णालय बांधले जाईल. गिरणा धरणावर सौर प्रकल्प उभारले जाणार असून त्यामुळे ६ कोटीचे वीजबिल मनपाचे वाचणार आहे. मनपासह सर्व रूग्णालयांना जनरेटर, पाणी उपशासाठी चारही प्रभागांकरिता सेक्शन पंप द्याने, रमजानपुरा येथे ४ कोटी ८० लाखाच्या निधीतून सुसज्ज रूग्णालय बांधले जाणार आहे. तर जाफरनगर रूग्णालयाचे लवकरच लोकार्पण केले जाईल. कच्च्या वस्तीत अधिकाधिक विकासकामे करण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती शेख रशीद यांनी दिली.मालमत्तांचे सर्व्हेक्षणशहरातील सर्व मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे. खाजगी कंपनीस हा ठेका दिला जाईल. साधारणत: शहरात घरे, कॉम्प्लेक्स, कारखाने अशी १ लाख ८० हजारावर मालमत्ता आहेत. सर्व्हेक्षणामुळे दरवर्षी मनपाचे मालमत्ता करात किमान १०० कोटीची वाढ होवू शकेल. सर्व्हेक्षणाचा निर्णय शहर हिताचा असल्याचे माजी आ. शेख रशीद यांनी सांगितले.