बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव असल्यामुळे बागलाणचे भूमिपुत्र प्रतापदादा सोनवणे व त्यानंतर २०१४मध्ये डॉ. सुभाष भामरे यांना मताधिक्य देऊन लोकसभेत पाठविले. या निवडणुकीतदेखील मोदी फॅक्टरनेच चमत्कार केल्याचे दिसून आले. बागलाणमध्ये डॉ. भामरे यांनी पाच वर्षात सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न, सटाणा शहरासाठी संजीवनी ठरणारी पुनंद पाणीपुरवठा योजना या भरीव कामांबरोबरच तालुक्याच्या जनतेशी असलेला जनसंपर्क याचादेखील मोठा प्रभाव राहिला आहे.बागलाण तसा काँग्रेसच्या विचारांबरोबर राहिला आहे. परंतु १९९५मध्ये राज्यातील भाजप-सेना युतीच्या काळात या भागातील भूमिपुत्र माजी आरोग्यमंत्री डॉ.दौलतराव आहेर यांनी मविप्र आणि वसाका या दोन्ही संस्थांच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली होती. या दोन्ही संस्था डॉ. आहेर यांची शक्तिस्थाने ठरली. या माध्यमातून बागलाणशी चांगला संपर्क आला. त्यावेळचे अपक्ष आमदार दिलीप बोरसे यांना सोबत घेऊन हरणबारी डावा आणि उजवा कालवा मंजूर करून कामालादेखील सुरुवात केली. या कामांमुळे डॉ. आहेर यांचा मोठा प्रभाव होता. त्यामुळे बागलाणने भाजपला शंकर अहिरे, उमाजी बोरसे यांच्या रूपाने दोन आमदार दिलेत.सुरुवातीला कॉँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याने मराठा मतांचे विभाजन होऊन मुस्लीम व्होट बँक पाटील यांना तारेल असे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात होते. मात्र मालेगाव मध्यमध्ये पाटील यांनी हिंदू राष्ट्राच्या लावलेल्या फलकांवरून केलेल्या आततायीपणाच्या प्रचारामुळे अखेरच्या टप्प्यात या निवडणुकीला जातीयतेचा रंग प्राप्त. झाल्याचे दिसून आले. त्यामुळेच मोदींच्या सुप्त लाटेचे रूपांतर त्सुनामीत झाल्याचे बघायला मिळाले.
बागलाणमधील विकासकामे; भाजपच्या प्रभावाचा करिष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:40 AM