प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचन साहित्य खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदान वाटपात नाशिक जिल्हा राज्यात प्रथम आला. जिल्ह्यातील २६०६ शेतकऱ्यांना ६ कोटी दहा लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले.
पोल्ट्री उद्योगावर संक्रांत, मका दर घसरले
चिकनमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याच्या अफवेने पोल्ट्री उद्योगाला यावर्षी दोन हजार कोटी रुपयांचा फटका बसला. कोंबडी खाद्य असलेल्या मक्यावर त्याचा परिणाम होऊन दर घसरले.
नाशिकमधून प्रथमच आल्याची निर्यात
कोरोनामुळे चीनच्या मालावर बंदी आल्याने भारतीय आल्याला परदेशात मागणी वाढली. नाशिकमधून प्रथमच युरोप आणि इराणमध्ये आल्याची निर्यात करण्यात आली. पहिल्याच वर्षी १६ कंटेनर माल पाठविण्यात आला.
द्राक्ष निर्यातीवर परिणाम
संचारबंदीच्या काळातही शेतीमाल वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली; मात्र ग्राहकच नसल्याने द्राक्षं विकायची कुणाला, असा प्रश्न निर्माण होऊन एप्रिल महिन्यात चार लाख मेट्रिक टन द्राक्षं पडून होती. निर्यातीवरही परिणाम झाला.
जोरदार पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले
जिल्ह्यात यावर्षी पडलेल्या जोरदार पावसामुळे रब्बी हंगामात गहू आणि मक्याच्या पेरणीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन २३ हेक्टरवर रब्बीची पेरणी वाढली.
टोळधाड आलीच नाही
लष्करी अळींमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना यावर्षीच्या रब्बी हंगामात टोळधाड येण्याचा धोका निर्माण झाला होता. कृषी आयुक्तालयाकडून याची दखल घेतली गेली; मात्र वर्षभरात टोळधाड आलीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
कांदा बियाणांचा तुटवडा
कांद्याला मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांनी कांदा विकला. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळेही नुकसान झाल्याने यावर्षी जिल्ह्यात कांदा बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. बियाणांसाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागली.
बोगस सोयाबीन बियाणे
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला पसंती दिली; मात्र बोगस बियाणांमुळे अनेकांचे सोयाबीन उगवलेच नसल्याने अनेकांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली.
रब्बीत जाणवली खतांची टंचाई
रब्बी हंगामात जिल्ह्यात रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली. लॉकडाऊनमुळे रॅक येण्यास होणारा उशीर आणि चांगला पाऊस यामुळे युरियाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती.
किसान पार्सल एक्सप्रेस
फळे, भाजीपाला आणि इतर नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी मध्य रेल्वेने ऑगस्ट महिन्यापासून किसान विशेष पार्सल एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात नाशिक येथून होऊन पहिल्याच दिवशी ५० टन शेतमाल घेऊन देवळाली कॅम्प ते बिहारमधील दाणापूरपर्यंत किसान एक्सप्रेस धावली.
अवकाळी पावसाचा फटका
सुरुवातीला पावसाने ओढ दिली; मात्र ऑगस्टमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कांदा दरात वाढ आणि निर्यातबंदी
सततच्या पावसामुळे दक्षिण भारतातील कांदा पिकाचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढल्याने सप्टेंबरमध्ये कांदा दरात वाढ झाली. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला, यामुळे लाखो टन कांदा गोदीत अडकला. यानंतर शेतकरी संघटनांनी जिल्ह्यात आंदोलन केले.
‘विकेल ते पिकेल’मध्ये कांदा, द्राक्ष
राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ योजनेत जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, डाळिंब या प्रमुख पिकांसह ११ पिकांचा समावेश करण्यात आला.
ट्रॅक्टर खरेदीत वाढ
यावर्षी कांदा, टोमॅटो या पिकांना चांगला भाव मिळाल्याने दसरा, दिवाळीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरची खरेदी केली. एकट्या कळवण तालुक्यात एकाच दिवसात ९३ शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले.