लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सत्तेवर असलेल्या ट्रिपल इंजिनच्या सरकारची नाळ जनतेशी जोडलेली आहे, आम्ही समजुतदार आहोत, अजितदादा यांनी यापूर्वीही उपमुख्यंमत्रीपद भूषविले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून मोठ्या मनाने स्वीकारले. उपमुख्यमंत्री फडणवीस हे मोठ्या मनाचे आहेत तसेच ते निष्कलंक आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मी मंत्रिमंडळात होतो. आता मी मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री आहेत. हा त्यांचा मोठेपणा आहे. मात्र, कद्रूपणा असलेल्या व्यक्तींकडून मनाचा मोठेपणा कसा येईल, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. विराेधकांनी वज्रमूठ बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती वज्रझूठ झाली. आता तर बोटेही गळून पडली, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी टीका केली.
पोट दुखत असेल, तर दोन डॉक्टर आहेत...‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून गरिबांना लाभ मिळत असेल तर काहींना पोटदुखी हाेते. अशांसाठी आमच्याकडे डॉ. एकनाथ शिंदे आहेत आणि त्यानंतरही गरज पडली तर अजित पवारदेखील आहेत, असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिले. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना दिवसा बारा तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत मोठा प्रकल्प राबविला जात असून, तीन वर्षांत सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू शकेल, असे ते म्हणाले.
मोदी यांच्यामुळे झपाट्याने विकासपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास झपाट्याने होत असून मोदी यांच्या नेतृत्वामुळे देशाची पत जगात वाढलेली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. केंद्र सरकारच्या मदतीनेच आपल्या राज्याला आर्थिक मदतीचा ओघ होत असल्याने विकासासाठी राज्य कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शासन आपल्या दरबारी कार्यक्रमात बोलताना सांगितले.
‘कलंक’ला भाजप देणार पत्रांद्वारे उत्तरनागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली ‘नागपूरला लागलेला कलंक’ अशी टीका भाजपने चांगलीच मनावर घेतली आहे. आता याला भाजपतर्फे ‘देवेंद्र फडणवीस केवळ नागपूरचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा अभिमान आहे’, असे लिहिलेले ३० हजार पोस्टकार्ड मातोश्रीवर पाठविण्यात येणार आहेत. भाजपचे युवा वॉरियर्स यांनी शनिवारपासून हे अभियान सुरू केले आहे.