देवगाव : कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यासाठी अनेक दिवसांपासून लसही उपलब्ध झाली आहे. लसीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोक लसीकरण करून घेण्यासाठी प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे शहरी भागातील व जागरूक नागरिकांनी ग्रामीण भागात येऊन आरोग्य केंद्रात लसीकरण करून घेतले. देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरणाचा तीन हजारांचा टप्पा पार झाला आहे.
या आरोग्य केंद्रांतर्गंत १७ गावे समाविष्ट आहेत. जवळपास ३९ हजार लोकसंख्या या केंद्रांतर्गत येते. देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गंत चार उपकेंद्र आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील नागरिकही लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. मात्र, शासनाकडून लस उपलब्ध होत नाही. केवळ शंभर ते दोनशे लस एकावेळेस उपलब्ध होते, तीही दोन ते तीन दिवसाआड. त्यात बाहेरील गावातील नागरिक याठिकाणी येऊन लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुरेशी लस उपलब्ध न झाल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.जून महिन्यानंतर शेतीची कामे सुरू होतात. त्यावेळी ग्रामीण भागातील लोकांना पुरेसा वेळ नसतो. त्यामुळे उर्वरित १५ ते २० दिवस अतिशय महत्त्वाचे असून, जास्तीत जास्त लस उपलब्ध झाली तर ग्रामीण भागातील नागरिकांचा त्यात सहभाग वाढेल. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी देवगावसह ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राला पुरेशी लस उपलब्ध करून द्यावी.- लहानू मेमाने, उपसरपंच, देवगाव.