नाशिक : शिधापत्रिकेवर नाव असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य त्याच लाभार्थ्याला मिळून धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी ‘ई-पॉस’ यंत्राचे साहाय्य घेऊन जिल्ह्यातील देवळा तालुक्यात राबविण्यात आलेला पहिलाच पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) यंत्राच्या वारंवार नादुरुस्तीने बारगळला आहे. यंत्राच्या सततच्या डोकेदुखीने त्रस्त दुकानदारांनी पुन्हा आपल्या पूर्वीच्याच पद्धतीचा वापर सुरू केला आहे. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर शासकीय व्यवहार कॅशलेस व्हावे यासाठी सरकार आग्रही असून, त्याचाच भाग म्हणून सार्वजनिक वितरण प्रणालीतही कॅशलेस व्यवहार सुरू करावेत त्याची पहिली पायरी म्हणून ‘ई-पॉस’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे.या प्रणालीत शिधापत्रिकाधारकांची संपूर्ण माहिती संगणकीकृत करून, शिधापत्रिकाधारकाला दरमहा किती धान्य मिळेल याबरोबरच शिधापत्रिकाधारकाचे नाव, पत्ता, बॅँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आदि माहितीही त्यात समाविष्ट असल्याने शिधापत्रिकाधारकाने रेशन दुकानात जाऊन आपल्या हाताचा ठसा यंत्रावर उमटविला तरच त्याला धान्य वितरीत होणार आहे. या प्रणालीतून रेशनच्या धान्याचा काळाबाजार तर रोखला जाईलच शिवाय याच प्रणालीचा आधार घेत कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचा शासनाचा हेतू असल्याने नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून ‘ई-पॉस’ प्रणालीचा वापर जानेवारी महिन्यात करण्यात आला. देवळा तालुक्यातील कांचने येथील सप्तशृंगी महिला बचत गटाकडून चालविले जाणारे रेशन दुकान तसेच देवळा शहरातील दुकान क्रमांक तीन या दोन्ही दुकानांमध्ये जानेवारी महिन्यात ‘ई-पॉस’ प्रणालीसाठी ओएसिस या कंपनीचे यंत्र बसविण्यात आले. पहिल्या महिन्यात रेशन दुकानाला जोडण्यात आलेल्या शिधापत्रिका धारकांना ई-पॉस प्रणालीतून धान्याचे वाटप करण्यात आले, त्यानंतर मात्र फेब्रुवारी महिन्यात सदरचे यंत्र बंद पडल्याने दुकानदारांना पुन्हा जुन्या पद्धतीने धान्याचे वाटप करावे लागले. कंपनीने नवीन यंत्र बदलून देण्यासाठी जुने यंत्र नेले व मार्च महिन्यात नवीन यंत्र आणून दिले, परंतु एप्रिल महिन्यात पुन्हा यंत्र बंद पडले. अखेर मंगळवारी पुन्हा दोन्ही दुकानदारांनी सदरचे यंत्र कंपनीला परत केल्याने पथदर्शी प्रकल्पच धोक्यात आला आहे.
रेशनचा काळाबाजार रोखण्यात यंत्राचा अडसर
By admin | Published: April 19, 2017 1:37 AM