नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तसेच वेतनातील फरकाची रक्कम बळजबरीने धनादेशावर सह्या करून काढून घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे यांचा जामीन अर्ज जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांनी बुधवारी (दि़ २८) फेटाळला़ या निर्णयामुळे पिंगळे यांचा मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला असून, जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे़जिल्हा सरकारी वकील अॅड़ अजय मिसर यांनी जामिनास विरोध करताना सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा तपास सुरू असून, आतापर्यंत पाच संचालकांचे जबाब पूर्ण झाले आहेत़ बाजार समितीतील काम करणाऱ्या १२८ कर्मचाऱ्यांपैकी ८५ कर्मचाऱ्यांनी पिंगळे जबरदस्तीने धनादेशावर सह्या करून रक्कम काढून घेत असल्याचे तसेच धमकी व दबाव देत असल्याची तक्र ारही लाचलुचपत विभागाकडे केली आहे़ नाशिकरोड शाखेतील ४ लाख ७३ हजार रुपयांची रोकड जप्त करावयाची असून, सुमारे बारा कर्मचाऱ्यांनी पोलिसांत धमकीबाबत तक्रारही नोंदविली आहे़तर बचाव पक्षाचे वकील अॅड़ एम़ वाय. काळे यांनी तपास पूर्ण झाला असून पिंगळे यांना मधुमेह असून अपघातही झाला असल्याचा युक्तिवाद केला़ तसेच एसीबीने ज्या लॉकरच्या तपासाचा मुद्दा पुढे केला त्यात काहीही आढळून आले नसल्याचे फोटोच न्यायाधीशांकडे सादर केले़ पिंगळे यांच्या जामिनावर न्यायालयात सुमारे दीड तास युक्तिवाद सुरू होता़ यावेळी समितीतील सुमारे १९ कामगारांनी अॅड़ राहुल कासलीवाल यांच्यामार्फत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता न्यायालयाने बाजू ऐकून घेण्यास नकार दिला़. देवीदास पिंगळे हे रविवारपासून (दि़ २५) नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असून, त्यांनी वकिलामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता़ दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची बुधवारी चौकशी केली जाणार होती़ मात्र, ही चौकशी होऊ शकली नसून गुरुवारी (दि. २९) दोन संचालकांची चौकशी केली जाणार आहे़ (प्रतिनिधी)बहुचर्चित तिजोरी रिकामीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सभापती देवीदास पिंगळे यांच्या तिजोरीचा मुद्दा न्यायालयात प्रत्कर्षाने मांडला होता़ विल्होळीनजीक असलेल्या गुदामामध्ये बुधवारी (दि़२८) ही तिजोरी उघडण्यात आली असता ती रिकामी आढळून आली़ त्यामुळे या तिजोरीतून मोठे घबाड मिळण्याचे अखेरीस भाकीतच ठरले़
देवीदास पिंगळे यांचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: December 29, 2016 12:36 AM