शैलेश कर्पे
सिन्नर : माउली... माउली.. असा आकाशाला गवसणी घालणारा आवाज, टाळ-मृदंगाचा दमदार ठेका, भगव्या पताकांनी केलेली दाटी, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा नामजप करीत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचा ‘रिंगण सोहळा’ सिन्नर तालुक्यातल्या दातली येथे पार पडला. नाशिक जिल्ह्यात झालेला रिंगण सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी वारकऱ्यांसह ५० हजार वैष्णवांचा मेळा येथे भरला होता.
त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा गुरुवारी रात्री लोणारवाडी येथे मुक्काम झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सिन्नर शहरात पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाले. दुपारी कुंदेवाडी येथे भोजन झाल्यानंतर दातली शिवारात रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
रिंगण सोहळ्यासाठी दातली शिवारात पालखी दुपारी तीन वाजता पोहोचली. पालखीचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पालखी तळावर येताच आसमंत माउलीमय होऊन गेला होता. रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी रांगोळी काढून फुलांचा सडा टाकण्यात आला होता. सोहळ्यातील रिंगण पाहण्यासाठी परिसरातून भक्तांनी गर्दी केली होती.
दुपारी चार वाजता पूर्ण रिंगण लावून झाल्यानंतर जरी पटका निशाणाने रिंगणाभोवती फेऱ्या मारल्यानंतर अश्व वायू वेगाने धावू लागताच भाविकांनी ‘माउलीऽऽ माउलीऽऽ’ असा जयघोष केला. टाळ्यांच्या कडकडाटात अश्वाने फेऱ्या पूर्ण केल्या. यावेळी वारकऱ्यांमधून टाळ-मृदंगाच्या निनादाने आसमंत दुमदुमून गेला. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्षण लक्षलक्ष नयनांनी आपल्या डोळ्यांत साठवून ठेवला. अश्व रिंगणानंतर देव रिंगण, टाळकरी रिंगण व विणेकऱ्यांचे रिंगण झाले. रिंगण सोहळा संपल्यानंतर अश्वाच्या टापाखालची माती घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यानंतर पालखी खंबाळे गावाकडे मुक्कामासाठी रवाना झाली.
यावेळी महंत रामकृष्ण महाराज लहवितकर, निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष संजय महाराज धोंडगे, पंडित महाराज कोल्हे, जयंत महाराज गोसावी, तुळशीराम महाराज गुट्टे, बाळकृष्ण महाराज डावरे, ॲड. भाऊसाहेब गंभीरे, शिवा महाराज आडके, किशोर महाराज खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
दातलीमधील पाचवा रिंगण सोहळा
निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडी सोहळ्याचे सिन्नर तालुक्यात यंदा ‘रिंगण’ सोहळ्याचे पाचवे वर्ष होते. या दिंडीचे पहिले रिंगण येथे झाले. शुक्रवारी दुपारी होणाऱ्या सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सरपंच लक्ष्मण शेळके व कैलास शेळके यांनी त्यांचे शेत रिंगण सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. ----------------
फोटो ओळी - सिन्नर तालुक्यातल्या दातली येथे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील रिंगण.