विहिरींनी गाठला तळ
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली असून, नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ज्या गावांमध्ये नळपाणी पुरवठा योजना आहेत, त्यांच्यावरही ताण येऊ लागला आहे. शासनाने ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होऊ लागली आहे.
कमी दाबाने पाणी पुरवठ्याची तक्रार
नाशिक : शहरातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यामुळे महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शहरात उन्हाची तीव्रता वाढली
नाशिक : मार्च महिन्यातच शहरात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. शहरातील चौकाचौकात शीतपेय विक्रीची दुकाने सुरू होऊ लागली आहेत. नागरिकांकडूनही शीतपेयांची मागणी वाढल्याने, या व्यावसायिकांना रोजगार मिळू लागला आहे.
किरकोळ बाजारात कांदादर चढेच
नाशिक : आवक वाढल्याने घाऊक बाजारांमध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असली, तरी किरकोळ बाजारात अद्याप कांद्याचे दर चढेच आहेत. कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या वर्षी शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
नाशिक : उपनगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही वेळा रात्रीच्या वेळी वीजपुवरठा खंडित होतो. यामुळे नागरिकांना झोप घेणे कठीण होते. उन्हाळा सुरू होताच, वीजपुरवठा खंडित होऊ लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्य वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.