त्र्यंबकेश्वर : बेजे चाकोरे येथील चक्रतीर्थावर ब्रह्मचारी आश्रमाचे महंत, साधू व जवळपास २५ हजार भाविकांनी स्वयंशिस्तीने पर्वस्नान केले. भाविकांच्या शिस्तबद्ध मार्गक्रमणामुळे येथे चोख पोलीस बंदोबस्त असूनही त्यांच्यावर विशेष ताण पडला नाही. दरम्यान, शासनाचे कोणतेही अनुदान न घेता पर्वस्नान यशस्वी होऊ शकते. हे ब्रह्मचारी आश्रमाचे महंत सोमेवरानंद सरस्वती यांनी दाखवून दिले.परिसरातील २५ गावांतील अबालवृद्ध भाविक पहाटे चक्रतीर्थावरील गोदावरी किकवी संगमावर साधू-मंहतांचे दर्शन करण्यासाठी आले होते. साधू-महंतांसोबत त्यांनी पर्वस्नान केले. महंत सोमेश्वरानंद यांना भाविकांनी भगवी वस्त्रे बहाल केली. नंतर इकोफ्रेंडली पद्धतीने सजवलेल्या दहा आकर्षक रथांमधून शाही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रस्थानी हनुमानाची पालखी होती. ७५ पोलीस अणि २५ होमगार्ड बंदोबस्ताला असूनही भाविकांनी स्वयंशिस्त पाळली. धक्काबुक्की, रेटारेटी असे कुठलेही प्रकार न होता पर्वस्नान उत्साहात व शांतेत पार पडले. भाविकांचा समजूतदारपणा पाहून पोलिसांनीही समाधान व्यक्त केले. वाहतुकीसाठी बसेसची संख्या खूपच मर्यादित असताना त्याबद्दल तक्रार न करता भाविकांनी चक्रतीर्थापर्यंत पायीच जाणे पसंद केले. चाकोरे गावापर्यंत अतिशय कमी गाड्या आल्या होत्या.पर्वस्नानाप्रसंगी आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, पंचायत समितीचे सभापती गणपत वाघ, उपसभापती शांताराम मुळाणे, बेजेचे उपसरपंच सुरेश चव्हाण, रोहिदास बोडके, जगन आचारी, परसराम चव्हाण, राजाराम चव्हाणके, तुकाराम मुकणे, कैलास चव्हाण, नवनाथ कोठुळे, रेणू बदादे आदि उपस्थित होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी रांगोळ्या, फुलांचे गालिचे आदिंद्वारे स्वागत केले. भजनात तल्लीन झालेले भाविक आणि देवतांची गाणी वाजवीत लक्ष वेधणारे आकर्षक बॅण्ड पथक आदिवासी भागात प्रभाव टाकताना दिसत होते. बापू पेंडोळे, सुनील शुक्ल, रत्नाकर जोशी यांनी यावेळी धार्मिक विधींचे पौरोहित्य केले.त्र्यंबकेश्वर येथील सेवेकरी रवि अग्रवाल, अभय मोरे, डॉ. मयूर गाजरे, डॉ. काळे आदिंसह हजारो भक्तांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या प्रसंगी श्रीनाथ महाराज, सुदर्शन महाराज, आनंद आखाड्याचे गंगागिरी महाराज, गिरिजागिरी महाराज आदिंसह साधू-महंत उपस्थित होते.(प्रतिनिधी)
शोभायात्रेत नागासाधूंचाही सहभाग
मिरवणुकीत भगवे ध्वज हातात घेऊन भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. याशिवाय १00 साधू व नागासाधूदेखील सहभागी झाले होते. शोभायात्रा शिलाईमाता मंदिरात आली. साधू-महंतांनी दर्शन घेतले. तेथून शिलाईमातेची पालखी घेऊन शोभायात्रा तीर्थाकडे रवाना झाली. चक्रतीर्थीवर दुपारी १२ वाजता प्रथम शंखध्वनी करून मंत्रघोषात हनुमान व शिलाईमाता या इष्टदेवतांची पूजा झाली. देवतांना स्नान घातल्यावर महंत सोमेश्वरानंदांसह साधू व नंतर भाविकांनी स्नान केले. या प्रसंगी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.