लायन्सतर्फे आदिवासी पाड्यांवर साड्या वाटप
नाशिक : लायन्स क्लब सुप्रीमच्या वतीने आदिवासी भागातील पाड्यांवर साड्या वाटप करण्यात आल्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने व काजोली या भागात साडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, सचिव सतीश कोठारी, विष्णुकांत गीते, मोहन आंबापुरे, संजय बोडके आदी उपस्थित होते.
गॅस दरवाढीने नागरिकांमध्ये नाराजी
नाशिक : स्वयंपाकाच्या सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने महिलावर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. इंधनाबरोबरच गॅसचे दर वाढल्याने महिलावर्गाचे महिन्याचे बजेट कोलमडून पडले आहे. दर दोन दिवसांनी गॅसचे नवे दर जाहीर होत असल्याचे महिलांनी चिंता व्यक्त केली आहे.
गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त कार्यक्रम
नाशिक : श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्ताने शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कोरोनामुळे धार्मिक कार्यक्रमांना निर्बंध आले असले तरी भाविकांपर्यंत प्रसाद पोहचविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनाही ऑनलाईन दर्शन घेण्याचे आवाहन अनेक देवस्थानांकडून करण्यात आले आहे.
दुचाकी पार्किंगने वाहनतळ फुल्ल
नाशिक : शरणपूर रोडवरील व्यावसायिक इमारतींच्या पार्किंगसाठी असलेल्या जागेपेक्षा अधिक दुचाकी उभ्या राहत असल्याने इमारत परिसरातून चालणेही कठीण झाले आहे. शहरात व्यावसायिक इमारतींच्या समोरील जागेत चारचाकी तसेच आतील बाजूला दुचाकी उभ्या केल्या जात असल्यामुळे इतरांची मोठी अडचण होते.