लखमापूर : कुटुंब संस्कारीत करण्याची जबाबदारी मातेची आहे. माता जर सुसंस्कृत असेल तर सर्व कुटुंबचं प्रगतिपथावर असते. धर्म, अनुष्ठान, हे कुटुंबाला संस्कारित करण्याचे मार्ग आहे. त्यामुळे मातांनी कुटुंबाला संस्कारित करण्यासाठी आध्यात्मिक मार्ग मजबूत करावा, असे आवाहन जय बाबाजी परिवाराचे प्रमुख स्वामी शांतीगिरी महाराज यांनी केले.
दिंडोरी येथे सदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्ताने शांतीगिरी महाराजांनी सामाजिक अंतराचे पालन करत भाविकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. स्वागत रामभाऊ जाधव यांनी केले. शांतीगिरी महाराज पुढे म्हणाले की, घरांमध्ये व मंदिरात भजन, कीर्तन झाले पाहिजे. भजन कीर्तनाने शरीरात आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे कौटुंबिक सुखाचे सर्व मार्ग मोकळे होतात. अन्नदान करून भाविकांनी पुण्यप्राप्ती करावी, असे ही ते म्हणाले. येथील मुख्य चौकात भक्तिफेरी फलकांचे अनावरण करण्यात आले. जनार्दन स्वामी महाराज पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्ताने दिंडोरीचे यजमान म्हणून सुधाकर जाधव, डाॅ.अंबादास भुजाडे यांचा बाबाजीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अनुष्ठानाची माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीताराम जाधव, भानुदास आहेर, खंडेराव आहेर, नीलेश गायकवाड, भगवान तासकर, बापू तासकर, संपत पिंगळ, राहूल गायकवाड, मंगेश आंबेकर, राहुल मुरकुटे, श्याम जाधव, नवनाथ जाधव, सोमेश्वर भुजाडे आदींनी परिश्रम घेतले.