नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखान्यावर अवसायक नेमून तो गिळंकृत करण्याचा सहकार मंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप शनिवारी (दि.२८) झालेल्या विशेष सभेत सभासदांनी केला. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात नासाकाच्या प्रश्नावरून त्यांना घेराव घालण्याचा निर्धारही सभेत करण्यात आला.नासाकाची विशेष सर्वसाधारण सभा कार्यस्थळावरील हॉलमध्ये प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष तानाजी गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कारखान्याने २०१७-१८ चा गळीत हंगाम सुरू करण्याची सर्व तयारी सुरू असताना व सहकार मंत्र्यांनी नेमलेले प्राधिकृत मंडळ कार्यरत आहे तरीदेखील अचानक प्राधिकृत मंडळ रद्द करून अवसायक नेमण्याची कार्यवाही सुरू करणे, जिल्हा बॅँकेने कारखाना विक्री व २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याबाबत निविदा प्रसिद्ध केल्याने सभेत सभासदांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. यावेळी माजी संचालक पी. बी. गायधनी यांनी कारखाना व शेतकºयांबाबत शासनाचा दृष्टिकोन चांगला नसून सहकार क्षेत्र संपवून खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. कारखान्यावर भाजपाप्रणीत प्राधिकृत मंडळ असताना कारखान्याची मालमत्ता गिळंकृत करण्याच्या दृष्टिकोनातून हे मंडळ बरखास्त करून त्यांच्यासह सभासदांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप गायधनी यांनी केला. राज्यात कुठेही २५ वर्षांच्या मुदतीसाठी कारखाना भाडेतत्त्वाने दिलेला नाही. मात्र नासाकाबाबत जिल्हा बॅँकेला हाताशी धरून सहकार मंत्र्यांनी ही खेळी केली असल्याचाही आरोप करण्यात आला. यावेळी काशीनाथ जगळे, हभप रामनाथ महाराज शीलापूरकर, अशोक खालकर, माधव गंधास, संतू पाटील हुळहुळे, संजय धात्रक, श्रीकांत गायधनी, अॅड. सुभाष हारक, चिंतामण विंचू आदींनी नासाकाबाबत शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष तानाजीराव गायधनी यांनी प्राधिकृत मंडळ नियुक्ती ते अवसायक नियुक्तीपर्यंतचा आढावा सांगून सहकारमंत्र्यांच्या भूमिकेची माहिती दिली.जिल्हा बॅँकेच्या कार्यकारी संचालकांची भूमिकासुद्धा संशयास्पद असून, आतापर्यंत कारखान्याने बॅँकेला १२५ कोटी रुपये व्याजापोटी भरल्याचे गायधनी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या सोमवारी होणाºया जनता दरबारात नासाका प्रश्नावरून घेराव घालण्याचा निर्धार सभेत करण्यात आला.
नासाका गिळंकृत करण्याचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:57 PM