पाथरे : सिन्नर तालुक्यातल्या देवपूर विद्यालयात विज्ञान छंद मंडळाच्या वतीने ‘कुतूहल व जिज्ञासा’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मंगळ मोहिमेबाबत सखोल माहिती देण्यात आली.याकार्यक्रमांतर्गत मंगळयान मोहीमेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात असलेले कुतूहल पत्रांच्या माध्यमातून थेट इस्त्रोच्या शास्त्रज्ञांकडे पोहचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून सुमारे तीनशे पत्र विज्ञान छंद मंडळाकडे जमा केली. मंगळावर पाणी, आॅक्सिजन आहे का, मंगळ ग्रह पृथ्वीपासून किती अंतरावर आहे, यानाला मंगळाच्या कक्षेत पोहचण्यास किती दिवस प्रवास करावा लागला, यानास कोणते इंधन वापरले जाते, यान तयार करण्यास कोणती विशेष कौशल्ये वापरण्यात आली, मंगळ मोहीमेस किती खर्च आला, मंगळावर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे का आदि अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी पत्रांद्वारे शास्त्रज्ञांना विचारले आहेत.संगणकाच्या युगात विद्यार्थीही जिज्ञासू बनत आहे. भारताच्या मंगळयान मोहीमेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहल व मंगळ मोहीमेबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा पूर्ण व्हावी याकरिता विज्ञान छंद मंडळाच्या वतीने ‘कुतूहल व जिज्ञासा’ हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मुख्याध्यापक एस. एस. गडाख यांनी सांगितले. मंगळ ग्रह, मंगळयान व या मोहीमेतील शास्त्रज्ञांविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांनीच शास्त्रज्ञांना पत्रे पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचे मुख्याध्यापक गडाख म्हणाले. उपक्रमाचे संयोजन पर्यवेक्षक पी. एन. रानडे, एस. जी. पगार, एन. जे. खुळे, पी. एस. बधान, एस. एस. घोटेकर, श्रीमती एस. के. मुंगसे, बी. सी. कुमावत, गणेश मालपाणी, एस. एस. सैंद्रे, श्रीमती व्ही. व्ही. पाटील, आर. पी. आहेर, एम. बी. जाधव, श्रीमती सुवर्णा मोगल, डी. एस. आदिक, रवी गडाख, सोपान गडाख, रत्नाकर गडाख, श्रीमती कविता पाटील आदिंनी केले. (वार्ताहर)
देवपूर विद्यालय विज्ञान छंद मंडळाचा उपक्रम
By admin | Published: October 17, 2014 11:46 PM