देवपूर : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथील नळपाणीपुरवठा योजना महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. येथे तातडीने टॅँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत सिन्नर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गावाजवळ वाहणारी देवनदी खळाळून वाहिलेली नाही. त्यामुळे परिसरातील भूजल पातळी खोल गेली असून, येथील नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरीने तळ गाठला आहे. ग्रामपंचायतीमार्फत सदर विहिरीचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीला पाणी नसल्याने महिनाभरापासून देवपूर येथे नळयोजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. गावातील ठिकठिकाणच्या कूपनलिकांसह इतर जलस्रोतही कोरडेठाक पडले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने नव्याने खोदलेल्या दोन कूपनलिकाही कोरड्याच निघाल्या आहेत.त्यामुळे देवपूरकरांना पिण्यासाठी विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. खासगी टॅँकर वितरकाकडून २०० लिटर पाणी घेण्यासाठी ५० रुपये मोजावे लागत आहे. (वार्ताहर)
देवपूरची पाणीपुरवठा योजना महिन्यापासून बंद
By admin | Published: March 02, 2016 10:46 PM