पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड कडाक्याची थंडी व दव पडत आहे. आज पाटोदा येथे अवघ्या सात अंश निच्चांकी तापमानाची नोंद झाली असून या भागात पहिल्यांदाच इतक्या कडाक्याची थंडी पडल्याचे शेतकरी वर्गाने सांगितले आहे.सकाळी नऊ वाजेपर्यंत कडक ऊन पडूनही पिकावरील गोठलेले दवबिंदू दिसत होते या वरून थंडीची तीव्रता लक्षात येते. कडाक्याच्या थंडीमुळे आज जनजीवन मोठया प्रमाणात विस्कळीत झाले आहे. दिवसभर पडलेल्या कडक उन्हातही थंडीची लहर येत असल्याने सर्व सामन्यांचे मोठे हाल झाले. थंडी व दविबंदू मुळे द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकर्यांना हुडहुडी भरली आहे.ऐन काढणीत आलेल्या द्राक्ष बागेतील मण्यांना तडे जात आहे तर डाळिंबाचे फळही तडकू लागले असल्याने द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकर्यांचे धाबे दणाणले असून त्यांच्या उरात धडकी भरली आहे. द्राक्ष ,डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून बागा वाचिवण्यासाठी विविध प्रकारची औषध फवारणी करून पिक वाचिवण्याचा आटापिटा चालविला आहे.गेल्या काही वर्षांपासून सतत दुष्काळाशी सामना करीत उपलब्ध असलेल्या पाण्यावर शेतकऱ्यांनी द्राक्ष व डाळिंब बागांची जोपासना केली आहे. या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामाची चांगले उत्पन्न येईल आशा आशेवर असलेल्या शेतकर्यांचा परतीच्या अवकाळी पावसाने पुरता भ्रमनिरास केला.या पावसाने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला तर द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाले .आॅक्टोबर मिहन्यात धरलेल्या सर्वच बागांचे नुकसान झाले . एकरी दोन ते अडीच लाख रु पयांपेक्षा जास्त खर्च करूनही निम्यापेक्षा जास्त द्राक्ष बागांना फळधारणा झाली नाही .आशाही परिस्थितीत शेतकर्यांनी जेमतेम आलेल्या बागांवर विविध प्रकारची औषध फवारणी करून बागा धरल्या मात्र मध्यंतरी असलेल्या ढगाळ हवामान व दाट धुक्यामुळे बागांवर विविध रोगांनी थैमान घातले .यातूनही शेतकर्यांनी आटापिटा करून पिक वाचवले .आता ऐन द्राक्ष हंगाम सुरु झाला असून अनेक शेतकर्यांनी द्राक्ष बागां व्यापार्यांना दिल्या आहे.मात्र दोन दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत असल्याने द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने आशा बागांपासून व्यापारी दूर जात असल्याने शेतकर्यांची अवस्था बिकट झाली आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे पिकांवर दव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 2:17 PM