नाशिक : नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने रोकडविरहित व्यवहार करण्यावर भर देण्याचा भाग म्हणून देशपातळीवर जनजागृती करण्यासाठी ‘डीजीधन’ मेळावे भरविण्याचे ठरविले असले तरी, अशा मेळाव्यांसाठी येणारा खर्च मात्र या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या बॅँका, भ्रमणध्वनी कंपन्यांच्या माथी मारला असून, मेळाव्यात उभारण्यात येणाऱ्या स्टॉल्ससाठी कमीत कमी ६० ते जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत खर्च येणार असल्याने एका दिवसासाठी इतका खर्च करण्यास संबंधितानी नाराजी व्यक्त केली आहे. देशातील काही निवडक शहरांमध्ये रोकडविरहित (कॅशलेस) व्यवहाराला प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकारने डीजीधन मेळावे घेण्याच्या सूचना केल्या असून, त्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नांदेड व नागपूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे येथे गेल्या महिन्यात हा मेळावा पार पडला असून, नाशिकमध्ये मेळावा घेण्याची तयारी सुरू आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी बॅँका, भ्रमणध्वनी कंपन्या, दूरसंचार विभाग, खासगी संस्था, कृषी, सार्वजनिक अन्नपुरवठा आदि संबंधित विभागांची बैठक घेतली. एकाच छताखाली नागरिकांना रोकडविरहित व्यवहार करण्याबाबत मार्गदर्शन, तसेच त्यासाठीच्या सुविधा या मेळाव्यात पुरविण्यात येणार आहेत. ्संबंधितांनी आपापले स्टॉल लावून त्या आधारे या सोयी द्याव्यात, असे ठरविण्यात आले. साधारणत: शंभराहून अधिक स्टॉल्स मेळाव्याच्या ठिकाणी उभारण्यात येणार असून, त्याचा खर्च मात्र स्टॉलधारकांनाच उचलावा लागणार आहे. शुक्रवारी यासंदर्भात पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यात स्टॉल उभारण्याचे काम शहरातील एका इव्हेंट कंपनीला देण्यात येऊन त्यांच्याकडून एकाच आकाराचे स्टॉल तयार करून घेण्याचे सादरीकरण करण्यात आले. (प्रतिनिधी)
‘डीजीधन’ मेळाव्याचा खर्च कंपन्यांच्या माथी
By admin | Published: February 19, 2017 11:48 PM