सिन्नर : नाशिक जिल्हा परिषद स्तरावरील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या सुटत नसल्याने तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या नकारात्मक भूमिकेच्या विरोधात ग्रामसेवक संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. त्याचाच भाग म्हणून तालुक्यातील ग्रामसेवकांनी सोमवारी सामुदायिक रजा टाकून सिन्नर पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, सरचिटणीस जालिंदर वाडगे यांच्या नेतृत्त्वाखाली धरणे आंदोलन केल्यानंतर तहसीलदार नितीन गवळी व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांना संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या सुटत नसतानाही ग्रामसेवक ग्रामीण भागात ताणतणावाच्या वातावरणात काम करीत आहेत. गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानात उद्दिष्टांपेक्षा जास्त शौचालयांचे बांधकाम केल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांच्या सत्कार करण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथे दिव्यांग महामेळावा यशस्वी करण्यात ग्रामसेवकांचा मोठा वाटा होता. सर्व कामे सांभाळून गाव स्तरावर मूलभूत सुविधा पुरविण्याचे काम ग्रामसेवक करीत आहेत. असे असताही ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्या सुटल्या नाहीत. उलट मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांची नकारात्मक भूमिकाच स्पष्टपणे दिसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. समस्या सोडविण्यात मीणा यांना स्वारस्य दिसत नाही. गेल्या २० वर्षांत ग्रामसेवक संघटनेने जिल्हा स्तरावरील समस्यांकरिता आंदोलन केले नाही. मात्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या नकारात्मक भूमिकेमुळे संघटनेने असहकार आंदोलन सुरू केल्याचे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन दीपककुमार मीणा यांची त्वरित बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. बदली न झाल्यास २९ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर व त्यानंतर ५ फेबु्रवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. धरणे आंदोलनप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सुमन बर्डे, सदस्य जगन्नाथ भाबड, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष अंबादास वाजे, आर. टी. शिंदे, के. एल. भदाणे, राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, नामदेव कोतवाल, जयराम शिंदे, दीपक लहमागे यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला. आंदोलनात दीपक निकम, परेश जाधव, जगन्नाथ पाटील, संदीप देवरे, वनिता वर्पे, संतोष बुचडे, राजेंद्र शिरोरे, फुलचंद वाघचौरे यांच्यासह तालुक्यातील ग्रामसेवक सहभागी झाले होते. वाघ यांच्या आत्महत्येची सीआयडी चौकशीची मागणी धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथील ग्रामसेवक एस. बी. वाघ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १५ जानेवारी रोजी घडली होती. या आत्महत्येस प्रवृत्त करणाºयांना कठोर शासन व्हावे व याकरिता या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीतर्फे चौकशी करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदनही तहसीलदार व संबंधित अधिकाºयांना देण्यात आले.
ग्रामसेवक संघटनेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:08 AM