सिन्नर : गेल्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण देण्याचे आश्वासन देत शिवसेना-भाजपने राज्यात सत्ता मिळविली. मात्र चार वर्षे होऊनही शासन धनगर समाजला आरक्षण देण्यात चालढकल करत असल्याने समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून, मनेगाव येथे धनगर समाजबांधवांनी घरावर काळ्या कापड्याच्या गुढ्या उभारून शासनाचा निषेध नोंदविला.आरक्षणासाठी धनगर समाजाने आता राज्यभर एल्गार पुकारलेला असून, त्याचाच एक भाग म्हणून धनगर समाजबांधवांनी आपापल्या घरावर शासनाच्या निषेधार्थ ‘काळ्या गुढ्या’ उभाल्या. अनुसूचित जमाजी प्रवर्गात असलेल्या ‘धनगड’ ही जात अस्थित्वात नसून धनगर हे धनगड आहेत. त्याच धर्तीवर धनगर समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज करत आहे. तथापि, वेळोवेळी राजकारण्यांनी समाजाला आरक्षणाचे ‘गाजर’ दाखवून सत्ता मिळविली. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने प्रचारादरम्यान सत्ता मिळताच समाजाला मागणीप्रमाणे आरक्षण देवू, असे आश्वासन दिले.त्यामुळे राज्यभरातील समस्त धनगर समाजबांधव भाजप-शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले व केंद्रातील तसेच राज्यातील सत्ता मिळवून देण्यात हातभार उचलला. आरक्षण देण्याचा विसर पडला. गेल्या चार वर्षांत समाजाच्या वतीने शांततेत मोर्चे काढून, निवेदने देवून आरक्षणाची मागणी केली, मात्र त्याकडे शासन दुर्लक्ष करीत असून समाजाला आरक्षण देण्यास चालढकल करीत असल्याची समाजाची भावना झाली आहे. त्यामुळे समाजाचे नेते गोपीचंद पडवळ व उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली समाजाने एल्गार पुकारून महाराष्टÑभर शासनाच्या विरोधात वेगवेगळे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.याप्रसंगी अॅड. सी. डी. भोजने, माजी सरपंच मीराबाई बुचुडे, भाऊसाहेब रोडे, अशोकराव बुचुडे, अण्णासाहेब ढवण, रामभाऊ भुचुडे, महेश बुचुडे, नीलेश रोडे आदी उपस्थित होते.दि. १२ ते १९ डिसेंबर या कालवधीत धनगर समाजबांधवांनी आपापल्या घरांवर ‘काळ्या गुढ्या’ उभारल्या आहेत. मनेगाव येथे धनगर समाजबांधवांनी आपापल्या घरावर ‘काळ्या गुढ्या’ उभारून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
धनगर समाजातर्फे काळ्या गुढ्यांनी निषेधं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:29 AM