नाशिक : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप असतानाही अद्याप त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांनी निवडणूकपत्रात दोन अपत्यांच्या माहितीचाही उल्लेख न करता निवडणूक आयोगाचीही फसवणूक केल्याचा आरोप करीत धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचे भान ठेवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे.
भाजपच्या महिला मोर्चातर्फे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमदार सीमा हिरे व देवयानी फरांदे यांच्या नेत्वृत्वात जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणीही आंदोलक महिलांनी केली. धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांच्याशी परस्परसंमतीने विवाहबाह्य संबंधातून दोन अपत्ये असल्याची कबुली देत त्यांना धनंजय मुंडे यांनी स्वत:चे नाव दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले असून करुणा शर्मा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे व लैंगिक शोषणाचे आरोप केल्याचे अधोरेखित करीत भाजप महिला मोर्चाच्या नाशिक शाखेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावेळी भाजप महिला मोर्चा अध्यक्ष हिमगौरी आहेर-आडके, प्रदेश उपाध्यक्ष संध्या कुलकर्णी, चिटणीस रोहिणी नायडू, नगरसेविका स्वाती भामरे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
( फोटो- १८पीएचजेएन ७८) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप महिला मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन करताना आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे यांच्यासह हिमगौरी आहेर-आडके, संध्या कुलकर्णी, रोहिणी नायडू, स्वाती भामरे आदी.