नाशिक : गोवत्स द्वादशीपासून दीपावली सणाला उत्साहात सुरुवात झालेली असताना शुक्रवारी (दि. २८) शहरात मोठ्या उत्साहात धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यात आला. धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरी जयंतीदेखील रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयांमध्ये साजरी करण्यात आली.अश्विन कृष्ण त्रयोदशीला साजरा करण्यात येणाऱ्या धनत्रयोदशीला संध्याकाळी पारंपरिक पद्धतीने धने, गूळ, साळीच्या लाह्यांसह अलंकार तसेच दागिन्यांची विधीवत पूजा करण्यात आली. शुक्रवारी प्रदोषदेखील असल्याने शिवभक्तांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर दुग्धाभिषेक तसेच बेलपत्र वाहून मनोभावे पूजा केली, तर व्यापारीवर्गाने जमाखर्चाच्या वह्या खरेदीचा मुहूर्त साधला. धनत्रयोदशीला धनाची पूजा करण्याला महत्त्व असल्याने व्यापारी तसेच दुकानदारांनी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे यांची पूजा केली. धन्वंतरी पूजनासह धन्वंतरी जयंतीदेखील शुक्रवारी साजरी करण्यात आली. झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची मनमोहक आरास पूजेभोवती करण्यात आली होती. शासनाने हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून घोषित केला असल्याने आयुर्वेदिक दवाखाने तसेच रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक जनजागृती शिबिरांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी मोठ्या उत्साहात धन्वंतरी मूर्तीचे पूजन केले. शुक्रवारी संध्याकाळी धन्वंतरी पूजनानंतर शहरात फटाके फोडण्यात आले तसेच कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येत फराळाचा आनंद लुटला. (प्रतिनिधी)
शहरात धन्वंतरी पूजन
By admin | Published: October 28, 2016 11:34 PM