नांदगाव : नगरपरिषदेने शहरात ढोली तारो ढोल बाजेच्या तालावर थकबाकी वसुलीची मोहीम सुरु केली असून थकबाकीदाराच्या घरांसमोर जाऊन बाकीचे ढोल वाजवून पैसे मागण्यास प्रारंभ केला आहे. वसुली पथकाच्या मागे गल्लोगल्ली बघ्यांची गर्दी जमत आहे. काहीठिकाणी पथकाला प्रतिसाद मिळत असला तरी काही ठिकाणी करदात्यांची मानसिकता... वाजव रे.... वाजव अशी असल्याचा अनुभव ही येत आहे.वारंवार मागणी करून थकबाकीची रक्कम न देणाऱ्या थकबाकीदार करदात्यांच्या घरापुढे नांदगाव नगरपरिषदेच्या वसुली कर्मचाऱ्यांनी ढोल ताशा वाजवून गांधीगिरी सुरु केली आहे. गेल्या महिन्यात थकबाकी न भरणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी दिला होता.नगरपरिषदेचा मालमता कर, पाणीपट्टी, शॉपिंग सेंटरचे गाळा भाडे व इतर करांची थकबाकी लाखो रूपयांवर गेली असून नगरपरिषदेच्या वसुली कर्मचाºयांना नागरिक दाद देत नाहीत. म्हणून थकबाकी दाराच्या घरासमोर ढोल वाजविण्याचा कार्यक्र म सुरु करण्यात आला आहे. तरीही थकबाकी भरली नाही तर शहरात मध्यवर्ती ठिकाणी नाव प्रकाशित करणे, नळ जोडणी बंद करणे, मालमत्ता जप्त करणे अथवा सील करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी श्रिया देवचके यांनी दिली आहे. वसुली मोहीम पथकात कार्यालय निरीक्षक गुलाब नवले, राहुल कुटे, अनिल पाटील, विजय कायस्थ, अनिल बुरकुल, अरु ण निकम, प्रकाश गुढेकर, पवन चव्हाण, राजेंद्र रोकडे, नंदू भालेकर यांचा समावेश आहे.
नांदगावी थकबाकी वसुलीसाठी ‘ढोल बजाओ’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:41 PM