नाशिक : इको टुरिझम योजनेंतर्गत चांदवड तालुक्यातील मौजे हट्टी परिसरातील धोडप किल्ला निसर्ग पर्यटनस्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने सन २०१८-१९ या वर्षासाठी १४ लाख १० हजारांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.चांदवड तालुक्यातील धोडप किल्ला परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी स्थानिक नागरिकांचीही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. तीन दिवसांपूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे हे कळवण दौऱ्यावर असताना त्यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानने राज यांची भेट घेऊन धोडप किल्ला परिसराच्या विकासासाठी निवेदन दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे लढवय्ये सरदार रामजी पांगेरा यांचे कन्हेरगड किल्ल्यावर स्मारक व्हावे आणि महाराष्ट्रातील तिस-या क्र मांकाचा असलेला उंच धोडप किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा, अशी मागणी करण्यात आली होती. ठाकरे घराण्याचे पूर्वज धोडप किल्ल्यावर किल्लेदार होते याची दीपक हिरे यांनी राज ठाकरे यांना आठवण करून देताच राज यांनी धोडपची सद्यस्थिती जाणून घेत त्यासंदर्भात शासनस्तरावर पाठपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राज यांचा जिल्हा दौरा संपण्यापूर्वीच राज्य शासनाच्या वनविभागाने धोडप किल्ला आणि मौजे हट्टी परिसराचा निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी १४ लाख १० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. इको टुरिझम योजनेंतर्गत हा विकास केला जाणार आहे. दरम्यान, प्रस्तावित कामांमध्ये निसर्गपूरक असलेल्या साहित्याचा जास्तीत जास्त वापर करण्याची अट घालण्यात आलेली आहे.