सिन्नर : तालुक्यातील धोंडबार येथील शिवछत्रपती शिवाजी विद्यालयातील इंग्रजी विषयाचे अभ्यासक केशव रहाटळ यांचे कोरोनामुळे निधन झाले. २१ वर्षाच्या सेवेप्रति कृतज्ञता म्हणून रहाटळ कुटुंबीयांना धोंडबार ग्रामस्थांनी एकत्र येत एक लाख रुपयांची मदत केली आहे.
मयत रहाटळ यांनी २१ वर्षे मान्यता प्राप्त विनाअनुदानित शाळेत अत्यल्प मानधनावर आपले कर्तव्य पार पाडले. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. प्रसंगी ग्रामस्थांनी वेळोवेळी त्यांना मदत केली आहे. त्यांच्या निधनामुळे हे कुटुंब उघड्यावरती पडले आहे. त्यांच्या कुटुंबाला आधार म्हणून अनेक सामाजिक बांधिलकी असलेले हात पुढे आले. उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, सिन्नर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मंजूषा साळुंके, सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. बी. देशमुख यांच्या हस्ते चित्राताई रहाटळ यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांच्या भरीव मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी तातूभाऊ जगताप, सरपंच वंदना कवटे, उपसरपंच प्रकाश खेताडे, जनार्दन खेताडे, शिवाजी खेताडे, राजाराम खेताडे, समाधान उबाळे, आकाश खेताडे, आर. बी. एरंडे, रामनाथ लोंढे, एस. टी. पांगारकर, आर. टी. गिरी, प्रसन्न रहाटळ, प्रथमा रहाटळ आदी उपस्थित होते.
-----------------
एकीचे दर्शन
अनेकांनी त्यांच्या कुटुंबाला वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न केला. ज्या मुलांना त्यांनी घडविले तेच मुले आज त्या गावातील जाणकार नागरिक आहे. त्यातील काही शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. त्यांच्यावर जे संस्कार केले त्याचेच फळ म्हणून की काय धोंडबार ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांनी एकत्र येत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मदतीचा हात दिला.
----------------
सिन्नर तालुक्यातील धोंडबार ग्रामस्थांनी एकत्र येत रहाटळ कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत केली. त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, राहुल कोताडे, मंजूषा साळुंके, एस. बी. देशमुख, चित्राताई रहाटळ, तातूभाऊ जगताप, वंदना कवटे, प्रकाश खेताडे आदी. (०३ सिन्नर ४)