नाशिक : सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सुहास शुक्ल यांचे कार्य चार दशकांपासून अविरत सुरू आहे. त्यांच्या जीवनातील विविध पैलूंची माहिती देणारे ‘ध्यासपर्व : सामाजिक बांधीलकीचे’ हे पुस्तक तरुणाईला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला.
गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलात रविवारी (दि. १६) सुहास शुक्ल यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. वास्तुविशारद राजाभाऊ मोगल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर डॉ. हेरंब गोविलकर, नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव
उपस्थित होत्या.
याप्रसंगी आमदार हिरे यांच्या कार्याचे कौतुक केले. राजाभाऊ मोगल यांनी शुक्ल यांच्या कार्याविषयी माहिती दिली. हेरंब गोविलकर यांनी ‘आत्मनो मोक्षार्थ आणि जगत हितायच’ या स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार सुहास शुक्ल यांचे कार्य असल्याचे सांगितले. दिलीप क्षीरसागर यांनी शुक्ल यांच्या नोकरीतील आठवणी सांगितल्या. कार्यक्रमास माजी आमदार निशिगंधा मोगल, भीमराव गारे, दिलीप क्षीरसागर, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, गोपाळ पाटील, विजय हाके, अभय चोक्सी, प्रदीप निकम, निवृत्त पोलीस अधिकारी मोहन मोहाडीकर, मृदुला शुक्ल, संजय देवधर आदींची उपस्थिती होती. स्वाती पाचपांडे यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन शुभांगी देवधर यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली.