नाशिक : क्षयरोगाच्या निदानासाठी थुंकीचे नमुने मुंबई अथवा पुणे येथे पाठविल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास सुमारे २० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, आता अवघ्या दोन तासांत क्षयरोगाचे निदान होण्याची सुविधा नाशिकमध्येच उपलब्ध होणार असून, महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात केंद्र सरकारच्या निधीतून अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना अगदी मोफत सदर सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली.सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी सुमारे ४० लाख रुपये किमतीची जीन एक्सपर्ट मशीन नाशिक महापालिकेला उपलब्ध करून दिली आहे. सदर मशिनरी नाशिकमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात आहे; परंतु सदर मशिनरीचा उपयोग केवळ एचआयव्हीग्रस्त रुग्णांसाठी केला जातो. परंतु, महापालिकेच्या कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बसविल्या गेलेल्या या मशिनरीमुळे क्षयरोग, एमडीआर क्षयरोग, लहान मुलांचा क्षयरोग तसेच इतर अवयवांचा क्षयरोग आदि सर्व तपासण्या करणे शक्य होणार आहे. आजवर एमडीआर क्षयरोगाच्या निदानासाठी रुग्णाच्या थुंकीचा नमुना मुंबई अथवा पुणे याठिकाणी तपासणीसाठी पाठविला जात होता. सदर नमुन्याचा अहवाल येण्यास बराच कालावधी जायचा. परंतु या अत्याधुनिक मशिनरीमुळे क्षयरोगाचे निदान अवघ्या दोन तासांत करणे शक्य होणार आहे. खासगी रुग्णालयात सदर मशिनरीमार्फत तपासणी करून घेतल्यास सुमारे ३ ते ५ हजार रुपये खर्च येतो. परंतु सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत महापालिका सर्व तपासण्या मोफत करून देणार असल्याचे अनिल चव्हाण यांनी सांगितले.
क्षयरोगाचे निदान आता दोन तासांत
By admin | Published: February 02, 2016 11:45 PM