नाशिक : राष्टय आरोग्य अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असलेल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या दि.२८ पासून जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे यांनी दिली.बालमृत्यूला अतिसार हे एक प्रमुख कारण मानले जाते. सरासरी १० टक्के बालके ही अतिसारामुळे दगावतात. हे बालमृत्यू प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. सन २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या अतिसार नियंत्रण पंधरवड्याच्या आयोजनानंतर आता नाशिक जिल्ह्णात २८ मे ते ९ जून या कालावधीत पंधरवडा साजरा केला जाणार आहे. अतिसराचे प्रमाण शून्य टक्क्यावर आणणे हा प्रमुख उद्देश असल्याचेदेखील वाघचौरे यांनी सांगितले. या मोहिमेत अतिसार आजाराची माहिती, त्याची कारणे, लक्षणे, उपचार, जबाबदारी, घ्यावयाची काळजी, ओआरएस आणि झिंक गोळीचे महत्त्व, वापर याची माहिती सर्वसामान्यांना देण्यात येणार आहे. सदर उपक्रम हा आरोग्य उपकेंद्रे, अंगणवाडी, प्रशाळा, ग्रामपंचायत या ठिकाणी आरोग्य विभागामार्फत आयोजित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपालिका, महानगरपालिका, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी या ठिकाणी ओआरएम आणि झिंक कॉर्नर स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे तातडीचे उपचार करणे सोपे होरार आहे. याबरोबरच आशा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दुर्गम व अतिसंवेदनशील भागात घरोघरी जाऊन ओआरएम आणि झिंक गोळ्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. यावेळी अतिसार झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचारदेखील केले जाणार आहे. सदर उपक्रमाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आवाहन मुख्य कार्येकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा अधिकारी डॉ. शैलेश निकम यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी आणि प्रभावी करण्यासाठी सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली असून, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. तालुकास्तरावर वैद्यकीय अधीक्षक अध्यक्ष आहेत. अति संवेदनशील व दुर्गम आदिवासी पाडे, मच्छीमारवस्ती, पूरग्रस्त वस्ती, भटक्या जमाती, विटभट्टी, बांधकाम, अनाथ आश्रम या ठिकाणी या तीन महिन्यांत रिक्त असलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
बालमृत्यू कमी करण्यासाठी अतिसार नियंत्रण पंधरवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 1:12 AM