कळवण : तालुक्यातील वीरशेत परिसरातील आदिवासी बांधवांना अतिसाराची लागण झाली असून, गावातील बंद असलेल्या हातपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने अतिसार या साथीने आदिवासी दुर्गम भागात थैमान घातले आहे. बुधवारी दुसऱ्या दिवसापर्यंत रुग्णांची संख्या ३७ पर्यंत पोहोचली आहे. कळवण उपजिल्हा रु ग्णालयात मंगळवारी रात्री उपचारासाठी दाखल केलेल्या दिलीप लक्ष्मण गवळी (१८ ) यांची तपासणीसह वैद्यकीय उपचार केल्याने प्रकृतीत सुधारणा झाली आहे. वीरशेतच्या हरिश्चंद्र जाधव (४०) यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला. अतिसाराच्या रु ग्णांची संख्या वाढत असल्याने आदिवासी बांधव भयभीत झाले आहेत. वीरशेतच्या जिल्हा परिषद शाळेत अतिसाराच्या रु ग्णावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तर काही रुग्णांनाची वैद्यकीय तपासणी करून प्रकृती ठीक असल्याकारणाने त्यांना घरी पाठविण्यात आले. दरम्यान वीरशेत येथे बुधवारी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, यशवंत गवळी, कळवण पंचायत समितीचे सभापती लालाजी जाधव, उपसभापती विजय शिरसाठ, माजी सभापती मधुकर जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विजय डेकाटे, साथरोग वैद्यकीय अधिकारी दिनेश पाटील, कळवणचे तहसीलदार कैलास चावडे, यांनी भेट देऊन रु ग्णांची विचारपूस केली.गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक मंगळवारपासून वीरशेत येथे तळ ठोकून आहेत. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे सर्व स्रोत बंद करण्यात आले असून, ज्या रु ग्णांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना अधिक उपचारासाठी दळवट, कळवण व नाशिक येथे पाठवण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
वीरशेत येथे अतिसाराची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 1:02 AM