नाशिक : मराठीत संस्कृत शब्दकोशाच्या निमित्ताने आज एक दर्जेदार शब्दकोश निर्माण झाला आहे. यातून एका शब्दाचे विविध अर्थ आणि त्यांची व्याप्ती त्या त्या शब्दांच्या व्याख्येतून समजणार आहे. मातृभाषेच्या रचनेतूनच शब्दकोश निर्माण व्हायला हवेत. त्याचमुळे कोशातून अभ्यासणारी भाषा व ज्ञानार्जन सुलभ होऊ शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाषा तज्ज्ञ डॉ. अविनाश बिनिवाले यांनी केले. संस्कृत भाषा सभेच्या ‘मराठी - संस्कृत’ शब्दकोशाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात संस्कृत भाषा सभेने निर्मित केलेला आणि गौतमी प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘मराठी - संस्कृत’ शब्दकोशाचे प्रकाशन डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे येथील भाषा तज्ज्ञ डॉ. अविनाश बिनिवाले, ज्येष्ठ संस्कृत अभ्यासक डॉ. रवींद्र मुळे, शब्दकोशाच्या संपादिका सरिता देशमुख, मीनल पत्की, श्रद्धा शहा, तेजश्री वेदविख्यात, प्रकाशक मिलिंद वाघ आणि रमेश देशमुख उपस्थित होते. जगभरात दोनशे वर्षांपूर्वी संशोधनपूर्ण अशा शब्दकोशांची निर्मिती होण्यास प्रारंभ झाला. शब्दकोशासह ज्ञानकोश आणि विश्वकोश अशा ग्रंथांची व्याप्ती वेगवेगळी असते. असे असले तरी ज्ञानकोश आणि विश्वकोशातील माहिती संक्षिप्तरूपात शब्दकोशात यायला काहीही हरकत नाही. त्यामुळे संबंधित शब्दाची व्याख्या नवशिक्या किंवा परकी भाषा शिकणाऱ्या अभ्यासकाला आकलन होऊ शकते, असेही डॉ. बिनिवाले यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्मिता आपटे यांनी मंत्रघोष केला. अंकुश जोशी, तेजश्री वेदविख्यात आणि मीनल पत्की यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रद्धा शाह आणि लीना हुन्नरगीकर यांनी, तसेच प्रकाशक मिलिंद वाघ यांनी शब्दकोशाविषयी मनोगत व्यक्त केले. शब्दकोशाच्या संपादिका सरिता देशमुख यांनी शब्दकोशाच्या निर्मितीचा प्रवास मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित नागरे यांनी, तर मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आभार मानले.
इन्फो
संस्कृत अभ्यासकांना लाभला दीपस्तंभ
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र मुळे म्हणाले की, प्रत्येक शब्दाचा आशय शब्दकोशातून व्यक्त व्हायला हवा. एका भाषेतील विचार दुसऱ्या भाषेत परिवर्तित होताना त्यात सुलभता निर्माण झाली तर वाचकाला त्या परक्या भाषेविषयी प्रेम निर्माण होत असल्याचे सांगितले. डॉ. मो. स. गोसावी यांनी संस्कृती ही देवभाषा असून, त्याद्वारे देशातील अनेक भाषा निर्माण झाल्या आहेत. या शब्दकोशाच्या रूपाने संस्कृत अभ्यासकांना एक दीपस्तंभ लाभला असल्याचेही गोसावी यांनी नमूद केले.