एसटी प्रवाशांच्या गैरसोयीसाठी?नाशिक : शहरातील प्रवासी वाहतूक करण्याची जबाबदारी महामंडळाची नसल्याचे सांगून हात झटकणाऱ्या एस.टी. महामंडळाने गेल्या वर्षभरात शहर परिसरातील जवळपास ७० बसेस काढून टाकण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आणि अनेक मार्गांवरील बसेसच्या फेºयाही कमी केल्या आहेत. महामंडळाच्या या कठोर भूमिकेमुळे विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत असताना महामंडळ मात्र प्रवाशांच्या या अवस्थेला महापालिकेस जबाबदार धरत आहे. प्रवाशांना वाºयावर सोडून बसेस काढून घेणाºया महामंडळाने यातून नेमके साध्य केले तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना सतावत आहे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एस.टी. महामंडळाने‘प्रवाशांच्या गैरसोयीसाठी’ अशीच भूमिका घेतल्याचा संशय निर्माण व्हावा असे निर्णण घेतले आहे़ महापालिका हद्दीतील बससेवा चालविण्यास नकार देत महापालिकेनेच सदर सेवा चालवावी, अशी अडवणूक केली आहे़ गेल्या वर्षभरापासून नाशिक महापालिकेचा यासाठी महामंडळाने पिच्छा पुरविला आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडून बससेवा सुरू करण्याबाबत विलंब होत असल्याने शहर बससेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे अधिकृत पत्र महापालिकेला देत गेल्या वर्षभरात सुमारे ७० बसेस कमी करण्याचा एकतर्फी निर्णयदेखील महामंडळाने अमलात आणला आहे. अशाप्रकारचा निर्णय अमलात आणल्यापासून शहरालगतच्या ग्रामीण भागातून शहरात नोकरी आणि शिक्षणासाठी येणाºया कामगार आणि विद्यार्थीवर्गाला रोजच मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.महापालिकेकडूनदेखील बससेवा चालविण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कोणताही अनुभव पालिकेला नसल्यामुळे साहजिकच अनेक कसोट्यांवर महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र इकडे महामंडळाला थांबण्यास वेळच नसल्याने त्यांनी महापालिकेवरच ठपका ठेवत आपल्या ताफ्यातील बसेस कमी करून टाकल्या आहेत. शहरातील बसेस कमी करून प्रवाशांचे होणारे हाल लपून राहिलेले नसताना प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीद शहरी आणि ग्रामीण असा भेद कसा करू शकते हा प्रश्न महामंडळाच्या सेवेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.नियम कसेही वळविणारे महामंडळसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मनपा हद्दीतील प्रवासी वाहतुकीची जबाबदारी ही महापालिकांची असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात येते. मात्र महापालिका जर एस.टी. महामंडळाला प्रवासी वाहतुकीचा तोटा भरून देणार असेल तर मग मात्र शहरातील बससेवा सुरळीत चालविण्याबाबत महामंडळाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा नियम अडसर ठरत नाही. एस.टी. महामंडळाची ही भूमिका म्हणजे महापालिकांना वेठीस धरण्याची असल्यासारखीच असून, राज्यातील चार महापालिकांची सेवा एस.टी.ने अशाच प्रकारे पुन्हा सुरू केलेली आहे.
महामंडळाने शहर बसेस कमी करून साधले काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:59 AM