लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकूडफाट्यामुळे पर्यावरणाची होत असलेली हानी लक्षात घेऊन डिझेल दाहिनीची संकल्पना महापालिकेने स्वीकारली खरी, परंतु प्रशासनाचे मात्र दाहिनीच्या या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. गळणारे डिझेल, इमारतीला गेलेले तडे आणि अन्य दुरवस्थांनी कोणीही त्याकडे कसे फिरकणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. नाशिक अमरधाममध्ये महापालिकेची एकमेव डिझेल दाहिनी आहे. महापालिकेने मोफत अंत्यसंस्कार योजना अमलात आणली असल्याने या डिझेल दाहिनीतही मोफतच अंत्यविधीची सुविधा आहे. तथापि, डिझेल दाहिनीकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष असून, तिची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा विसर पडला आहे. दाहिनीची दुरवस्था झाली असून, तिच्या इंधन वाहिन्यांमधून डिझेलची गळती झाल्याने मोठ्या प्रमाणात डिझेल जमिनीवर पसरून वाया जात आहे. अशाप्रकारे डिझेलच्या गळतीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डिझेल दाहिनीची दुरवस्था
By admin | Published: May 22, 2017 2:27 AM