नाशिक : चित्रपटातील पोलीस आणि प्रत्यक्षातील पेालीस यांच्यात फरक असतो. प्रसंगावधानता हा अत्यंत महत्त्वाचा गुण पोलिसांच्या अंगी आवश्यक असतो, कधी एखादी कारवाई केली तर का केली आणि कारवाई नाही केली तर का केली नाही, याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे सूचक विधान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांमुळेच पोलिसांना होश आणि जोश यांचे तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे लागतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या ११८व्या तुकडीतील ६६८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी राष्ट्रध्वजासमोर मंगळवारी (दि. ३०) 'खाकी'ची शपथ घेत निःपक्षपातीपणे देशाच्या संविधानाचा सदैव मान राखत जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली. यावेळी ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थींना दूरदृष्यप्रणालीद्वारे उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पोलीस एकीकडे नक्षलवाद्यांशी लढत आहेत, तर दुसरीकडे कोरोनासारख्या संकटाचादेखील सामना करीत आहेत. दिसणाऱ्या शत्रूवर तुटून पडता येते. मात्र, अदृष्य स्वरूपातील कोरोनासारख्या शत्रूशी पोलीस जीवाची बाजी लावून लढत आहेत. त्यामुळे पोलिसांचे कौतुक करतानाच त्यांनी कोरोना विषाणू प्रमाणेच स्वरूपात बदल करणारी गुन्हेगारीदेखील आव्हानास्पद आहे. सध्या कोरोनाप्रमाणेच गुन्हेगारीचे स्वरूप बदलले असून, ऑनलाईन गुन्हेगारी वाढली असून, ती रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
यावेळी प्रबोधिनीची संचालक अश्वती दोर्जे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना शपथ दिली आणि प्रशिक्षणातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आढावा घेतला. या कार्यक्रमात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.
...इन्फो...
पीएसआय शुभांगी यांना मानाची 'रिव्हॉल्व्हर'
यावेळी उपनिरीक्षकांनी शानदार संचलन केले.
पोलीस उपनिरीक्षक शुभांगी शिरगावे यांनी परेड कमांडर म्हणून नेतृत्व केले.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिरगावे यांना सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीचा सन्मान म्हणून उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाची रिव्हॉल्व्हर प्रदान करण्यात आली. तसेच पीएसआय सलीम शेख आणि अविनाश वाघमारे यांनाही उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून यावेळी गौरविण्यात आले. पोलीस प्रबोधिनीच्या ११८व्या प्रशिक्षणार्थी पीएसआयच्या तुकडीत ४७० पुरुष, १८८ महिला आणि १० गोवा केडरचे प्रशिक्षणार्थी यांचा समावेश होता.
इन्फो...
यंदा प्रथमच मानाची रिव्हॉल्व्हर
गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अकादमीच्या दीक्षान्त सोहळ्याला प्रत्यक्षपणे हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी काळ बदलला असून, नव्याने पोलीस दलात दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांना मानाची तलवारऐवजी रिव्हॉल्वर प्रदान करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार प्रथमच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाला मानाची रिव्हॉल्वर देऊन गौरविण्यात आले.