नाशिक : चित्रपटातील पोलीस आणि प्रत्यक्षातील पोलीस यांच्यात फरक असतो. प्रसंगावधानता हा अत्यंत महत्त्वाचा गुण पोलिसांच्या अंगी आवश्यक असतो, कधी एखादी कारवाई केली, तर का केली आणि कारवाई नाही केली, तर का केली नाही, याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांमुळेच पोलिसांना होश आणि जोश यांचे तारतम्य ठेवून निर्णय घ्यावे लागतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले.नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या ११८ व्या तुकडीतील ६६८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी राष्ट्रध्वजासमोर मंगळवारी ‘खाकी’ची शपथ घेत निःपक्षपातीपणे देशाच्या संविधानाचा सदैव मान राखत जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली. यावेळी ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थींना दूरदृश्यप्रणालीद्वारे उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.पोलीस एकीकडे नक्षलवाद्यांशी लढत आहेत, तर दुसरीकडे कोरोनासारख्या संकटाचादेखील सामना करीत आहेत. दिसणाऱ्या शत्रूवर तुटून पडता येते. मात्र, अदृश्य स्वरूपातील कोरोनासारख्या शत्रूशी पोलीस जिवाची बाजी लावून लढत आहेत. त्यामुळे पोलिसांचे कौतुक करतानाच त्यांनी कोरोना विषाणूप्रमाणेच स्वरूपात बदल करणारी गुन्हेगारीदेखील आव्हानास्पद आहे. सध्या कोरोनाप्रमाणेच गुन्हेगारीचे स्वरूप बदलले असून, ऑनलाइन गुन्हेगारी वाढली असून, ती रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पीएसआय शुभांगी यांना मानाची ‘रिव्हॉल्व्हर’पोलीस उपनिरीक्षक शुभांगी शिरगावे यांनी परेड कमांडर म्हणून नेतृत्व केले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिरगावे यांना सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीचा सन्मान म्हणून उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते मानाची रिव्हॉल्व्हर प्रदान करण्यात आली, तसेच पीएसआय सलीम शेख आणि अविनाश वाघमारे यांनाही उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून यावेळी गौरविण्यात आले.
चित्रपटांतील पोलीस आणि खऱ्या पोलिसांत फरक - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 9:57 AM