पंचवटी : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून एकाच रुग्णाला उपचारासंदर्भात वेगवेगळे सल्ले दिले जात असल्याने रूग्ण व त्यांचे नातेवाईकही चक्रावले असून, नेमके ऐकावे कोणाचे, असा प्रश्न त्यांना पडू लागला आहे. तपासणी न करताच डॉक्टरांकडून कोरोनाचे औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो, तर औषधे घेण्यासाठी चाचणी महत्त्वाची असल्याचे सांगून, आरोग्य विभागच रुग्ण व त्याच्या नातेवाइकांचा छळ करू लागले आहेत.
पंचवटीतील बहुतांशी कोरोना बाधित रुग्णांना अशाच प्रकारचा अनुभव येत असून, एकीकडे महापालिकेतून फोन आल्यानंतर त्रास होत नसेल, तरी गोळ्या, औषधे घ्या असे सांगितले जात असून, तर दुसरीकडे कोविड सेंटरला गोळ्या, औषध घेण्यासाठी गेल्यानंतर संबंधित त्रास होत नसेल, तर गोळ्या नका घेऊ ओव्हरडोस होईल. त्यामुळे कदाचित तुमच्या किडनीला त्रास होऊ शकतो, असे स्पष्ट करत असल्याने, रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक भीतिपोटी माघारी फिरत आहेत.
कोविड सेंटरला रुग्ण तपासणीसाठी नेले, तर यंत्रणेतील काही जण रुग्णाला बरे वाटत असेल, तर काही तपासणी करू नका आणि गोळ्या औषधे घेऊ नका, असे स्पष्ट करत आहेत त्यामुळे एकाच यंत्रणेकडून दिल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या सल्ल्यांमुळे सध्यातरी कोविड रुग्ण त्यांचे नातेवाईक द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. त्यामुळे नेमके ऐकायचे कुणाचे, असा सवाल केला जात आहे. एका यंत्रणेकडून वेगवेगळे सल्ले दिले जात असल्याने, सध्या तरी कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची मात्र चांगलीच डोकेदुखी ठरत आहे.