मालेगाव : भारत सरकारच्या बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएल या आॅइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिश्रण करीत असून, इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्याने पेट्रोल व इथेनॉल विभक्त होऊन वाहनचालकांना अडचणी निर्माण होतात, अशी माहिती नाशिक डिस्ट्रीक्ट पेट्रोल डीलर वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. इथेनॉल हे पाण्याच्या संपर्कात आले तर त्याच्या रासायनिक गुणधर्मामुळे पेट्रोलपासून वेगळे होते. वाहनचालकाच्या पेट्रोल टाकीत सर्व्हिसिंग करताना पाणी जाण्याची शक्यता असते. तसेच वातावरणातील आर्द्रतेमुळेसुद्धा पेट्रोल टाकी अल्पप्रमाणात वाफेच्या स्वरूपात पाणी इथेनॉलमिश्रित पेट्रोलच्या संपर्कात आल्याने इथेनॉल व पेट्रोल विभक्त होतात. त्यामुळे वाहन चालू होत नाही व विविध समस्या निर्माण होतात. यात पेट्रोलमालकांचा काही दोष नसताना त्यांना दोषी धरून वाद घातले जातात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. जिल्हाधिकारी व आॅइल मार्केटिंगच्या संयुक्त बैठकीत याची माहिती देण्यात आली. पेट्रोलपंपाच्या भूमिगत पेट्रोल साठविण्याच्या टाक्यांमध्ये पाणी आहे की नाही याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत पत्रकार परिषदेत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.पत्रकार परिषदेस संजय धोंडगे, कमलाकर चव्हाण, नरेंद्र शाह, सुधीर खैरनार, महेश मालपुरे, राजेश पवार, नाजिम शेख, नीलेश लोढा, सचिन हांडोरे आदी उपस्थित होते.
इथेनॉल पाण्याच्या संपर्कात आल्याने अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:37 PM