नाशिक- महापालिकेत यापूर्वी दर महिन्याच्या वीस तारखेला अंतिम हजेरी तयार करून वेतनपत्रक लेखा विभागाकडे पाठवले जात होते; मात्र आता १ते ३० अशी तारखेंची सायकल केल्याने वेतनाला मात्र पंधरा तारीख उजाडून जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. विशेषत: ज्या कर्मचाऱ्यांना दहा तारखेच्या आत कर्जाची परतफेड किंवा अन्य देणी द्यायची असतात, त्यांची अडचण होत आहे. महापालिकेत यापूर्वी २० ते २० असा महिना गृहीत धरून वेतन काढले जात असे. त्यामुळे २० तारखेनंतर पगार पत्रक काढल्यानंतर त्याची पुढील प्रक्रिया पूर्ण हाेताना दहा दिवस लागतात आणि १ तारखेला पगार होत असे; मात्र आता त्यात बदल करून ३० तारखेपर्यंतची हजेरी झाल्यावर वेतन पत्रके खाते प्रमुखांकडून तयार केली जातात. ती लेखा विभागाकडे जाऊन वेतन होण्यास दहा तारखेला किंवा त्यानंतर वेतन होते त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे देणी, कर्जफेडीचे वेळापत्रक मात्र विस्कळीत होते. यापूर्वी म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्यावतीने प्रशासन उपआयुक्तांना निवेदनदेखील देण्यात आले आहे.
राज्यातील वेगवेगळ्या महापालिकेत वेगवेगळ्या तारखांना अंतिम तारीख मान्य करून वेतनाची प्रक्रिया राबवली जाते; मात्र नाशिकमध्ये सुरळीत चाललेली प्रक्रिया रद्द केल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.