नाशिक : विश्वशांती, सुबत्ता, चांगला पाऊस पडण्यासाठी चोपडा लॉन्स येथे एमबीएस समिती व सकल दिगंबर जैन समाजातर्फे सिद्धचक्र विधानाचे आयोजन करण्यात आले असून, १९ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. आचार्य तीर्थनंदी महाराज व ऐलक तत्त्वनंदी महाराज यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम होत आहे. यावेळी बोलताना आचार्य तीर्थनंदी महाराजांनी सांगितले की, जो आपल्या भविष्याचा विचार करतो, तो सच्चा माणूस असतो. संसारातून मुक्ती मिळण्याचे ज्याचे ध्येय असते, तोच मोक्षाला पोहोचू शकतो. संसार वाढवायचा आहे, व्यापार वाढवायचा आहे, सर्व सुख-सोयी पाहिजेत, असे म्हणताना भविष्याचा विचारच केला नाही तर त्याचा काय फायदा? त्यामुळे परमेश्वराच्या दर्शनासाठी २४ तासातून ५ मिनिटे वेळ द्या. दिवसातून एकदा देवाचे दर्शन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या विधानात सौधर्म इंद्र होण्याचा मान अमित लोहाडे व शुची इंद्राणी होण्याचा मान राशी लोहाडे यांना मिळाला. शांतीमंत्राचा मान जयचंद पाटणी परिवाराने घेतला. यावेळी दिगंबर जैन सैतवाल समाजाचे अध्यक्ष दीपक काळे, अनिल जिंतुरकर, अंजनगिरी ट्रस्टचे अध्यक्ष पवन पाटणी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष विजय लोहाडे, श्वे. स्थानकवासी संघाचे अध्यक्ष मोहनलाल साखला, चोपडा ग्रुपचे सुनील चोपडा, डॉ. विक्र म शाह, डॉ. पुष्कर पटणी, मुकेश ठोले, अशोक लोहाडे, दिलीप लोहाडे आदिंसह शेकडो भाविकउपस्थित होते. १९ जूनपर्यंत चालणाऱ्या या विधान महोत्सवात सकाळी ६.३० वाजता पूजन, ७.३० विधान, १० वाजता आहार चर्या, सायंकाळी ७.३० वाजता आरती, स्वाध्याय वाचन आदि कार्यक्र म होत आहेत. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक पंकज गोधा, अभिषेक कासलीवाल यांनी केले आहे.चोपडा लॉन्स येथे एमबीएस समिती व सकल दिगंबर जैन समाजातर्फे सिद्धचक्र विधानाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.
दिगंबर जैन समाजातर्फे सिद्धचक्र विधानास प्रारंभ
By admin | Published: June 15, 2016 9:44 PM