पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा स्मार्ट बनविण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेतला आहे. बुधवारी लोकसहभागातून शाळेचे रूप पालटले असून, वर्गखोल्या डिजिटल करण्यात आल्या आहेत.गाव पातळीवर शाळा केंद्रबिंदू ठेवण्यात आला आहे. शाळेच्या नूतन इमारतीचे नुकतेच बांधकाम पूर्ण झाले आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळाले पाहिजे या हेतूने पांगरी खुर्द ग्रामपंचायत व छावाचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी प्रत्येकी संगणक संच व एलईडी टीव्ही आणि एलसीडी प्रक्षेपक भेट देऊन शाळेत डिजिटल क्लासरूम बनविण्यात आली आहे. पांगरी खुर्द गावांत जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी शाळा असून येथील विद्यार्थी अधिक गुणवंत व्हावेत, त्यांच्यात ज्ञानाची चुरस निर्माण व्हावी यासाठी शाळा व ग्रामस्थ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील शेतकरी रमेश शिंदे, श्रीहरी शिंदे व भारत शिंदे या तीन भावंडांनी वडील विठोबा भागूजी शिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेस एकवीस हजार रुपयांची रोख रक्कम देणगी म्हणून दिली आहे. मुख्याध्यापक रविता भोईर यांच्याकडे सदरची देणगी सुपूर्द केली. देणगीची रक्कम बँकेत कायमठेव म्हणून ठेवली जाणार असून, व्याजापोटी मिळणारी रक्कम दरवर्षी १५ आॅगस्टला पहिली ते चौथीमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला रोख स्वरूपात बक्षीस दिले जाणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार असून, शैक्षणिक ज्ञानाची स्पर्धा निर्माण होऊन त्यांची गुणवत्ता वाढ व विकास होणार असल्याचे शिंदे कुटुंबीयांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
पांगरी शाळेत डिजिटल वर्गखोल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 11:34 PM