नांदगाव : भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून हिसवळ बुद्रुक ता नांदगाव या गावातून प्रत्येक कुटुंब इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खातेदार झाले असुन येथे कॅशलेस व्यवहाराची सुरूवात झाल्याने देशात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे डिजिटल ग्राम म्हणून हिसवळ बुद्रुक गावाचे नाव घोषित झाल्याची माहिती मालेगाव डाकविभागाचे प्रमुख डाक अधिक्षक नागेश्वर रेड्डी यांनी दिली. आठ दिवसात संपूर्ण गावाने पोस्टात ५५० खाती उघडून विक्र म केला.सैनिकांचे गाव म्हणून पुर्ण नासिक जिल्ह्यात ओळख असलेल्या हिसवळ बुद्रुक गावाने टपाल बँकिंगचा पर्याय स्वीकारत त्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. या गावात एकही बँक वा पतसंस्था नसल्याने कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यासाठी नांदगाव किंवा मनमाड शहरात जावं लागत असे. परंतु या टपाल बँकिंगमुळे आता गावात आर्थिक व्यवहार होण्यास सुरु वात झाली आहे आणि तेही कॅशलेस. येथील ग्रामस्थांचा विश्वास, डाक विभागाचे सहकार्य आणि हिसवळ बुद्रुक चे पोस्ट मास्तर हर्षद मोरे यांच्या प्रयत्नातून एका आठवड्यात गावाने हे शक्य केल. त्यासाठी हिसवळ बुद्रुक येथिल मार्केट कमिटी सदस्य राजेंद्र देशमुख, जि. प. सदस्य आशा जगताप, सरपंच जनाबाई बेंडके सर्व ग्रामपंचायत सदस्य मंडळी यांनी सहकार्य केल्याने डिजिटल ग्रामचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबईच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे यांचे मार्गदर्शन लाभले. अध्यक्षस्थानी डाक अधिक्षक नागेश्वर रेड्डी होते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचे वरिष्ठ प्रबंधक परमेश्वर क्षीरसागर, डाक निरीक्षक मनमाड राजेंद्र वानखेडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत गावातील यशाबद्दल प्रमुख पदाधिकार्याचा सत्कार केला. ग्रामस्थ, डाक आवेक्षक आहिरे, मनमाडचे पोस्टमास्तर निलेश कपिले, नांदगावचे पोस्ट मास्तर डी टी पवार व कर्मचारी उपस्थित होते. हिसवळ बुद्रुकचे पोस्टमास्तर हर्षद मोरे, विशाल सानप, भगवान शेरेकर, प्रल्हाद बैरागी दत्ता सोनवणे, विकास देवरे, नागपुरचे शिंदे मास्तर, अनिता मगर , आदीनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जितेंद्र देशमुख यांनी केले.
हिसवळ झाले पोस्टाचे डीजीटल ग्राम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 1:51 PM