नाशिकरोड : वीजपुरवठा खंडित करण्याबाबत थकबाकीदार ग्राहकांना डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य धरण्यास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा मार्ग अधिक सोपा व गतिशील झाला आहे. महावितरणने वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदर वाढ प्रस्ताव क्रमांक १९५/२०१७ च्या निकालात वीजपुरवठा खंडित करण्याबाबत ग्राहकाला दिलेली डिजिटल नोटीस कायदेशीर ठरविण्याचा निर्णय आयोगाने दिला आहे. परिणामी एसएमएस, व्हॉट्स अॅप, ई-मेलद्वारे पाठविण्यात येणारी नोटीस ग्राह्य ठरणार आहे. विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ अन्वये वीजपुरवठा तोडण्यापूर्वी महावितरणने ग्राहकाला लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे. लेखी नोटीस ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी लागणारा कालावधी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात अडसर ठरत होता. त्यामुळे महावितरणने डिजिटल स्वरूपात पाठविण्यात येणारी नोटीस ग्राह्य धरण्याची मागणी आयोगाकडे केली होती. गेल्या काही वर्षांपासून महावितरणने वीज ग्राहकांचे मोबाइल क्रमांक तसेच ई-मेल नोंदवून घेतले आहेत. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वीजपुरवठा, मीटर रिडिंग, वीज बिलाचा तपशील आदींची माहिती एसएमएसद्वारे देण्यात येते.२ कोटी ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकाची नोंदमहावितरणकडे राज्यातील २ कोटी ५ लाख ग्राहकांचे मोबाइल क्रमांक नोंदविण्यात आले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील ११ लाख ७०७ वीज ग्राहकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ग्राहकांच्या तुलनेत जवळपास ७७ टक्के ग्राहकांनी त्यांचे मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदविले आहेत. वीज नियामक आयोगाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस कायदेशीर असल्याबाबत मान्यता दिल्याने महावितरणचा मार्ग सुकर झाला आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याबाबत डिजिटल स्वरूपात दिलेली नोटीस ग्राह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:01 AM