नाशिक : ज्या नाशिक अन् देवळालीच्या भूमीत दिलीपकुमार यांच्या युवावस्थेतील काही काळ गेला होता, त्या नाशिक अन् देवळाली परिसराबद्दल त्यांच्या मनात कायमच एक विशेष जिव्हाळा होता. बार्न्स स्कूलकडील रस्त्यावर असलेल्या त्यांच्या बंगल्याच्या स्मृती तसेच आई, वडिलांच्या काही स्मृतींनादेखील त्यांच्या मनात कायम स्थान होते. त्याबद्दल ते भेटींमध्ये कायमच विशेष आपुलकीने आठवणी काढायचे, अशा शब्दात दिलीपकुमार यांचे पुतणे जावेद खान यांनी त्यांच्या स्मृतींचा पट उलगडला.
दिलीपकुमार यांच्या तरुणपणातील काही काळ त्यांनी देवळालीच्या परिसरात घालवला असून, येथील हवा, पाणी आणि एकूणच आपुलकीची भावना त्यांच्या मनात कायम होती. त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी आम्ही कुटुंबातील ज्येष्ठांकडून ऐकून होतो. तसेच जेव्हा केव्हा कोणत्याही कारणाने भेट झाली तर ते नाशिक आणि देवळालीबाबत खूप आपुलकीने बोलायचे. त्यांच्या आई, वडिलांना याच भूमीत दफन केलेले असल्याने ते काहीवेळा केवळ त्यांच्या कबरीवर पुष्पचक्र वाहण्यासाठीदेखील नाशिकला येऊन गेले होते. नाशिकच्या परिसरात जमीन घेऊन फार्महाउस बांधण्यासाठी त्यांनी दोन -अडीच दशकांपूर्वी नाशिकला जमीनदेखील घेतली होती. मात्र, त्यात जमिनींचे वादविवाद झाल्यानंतर मग त्यांनी पुढे फारसा रस घेतला नाही. फार पूर्वीच्या काळी त्यांचे काही मित्र नाशिकला होते, त्यांच्याबाबतही ते पूर्वी चौकशी करायचे, असेही जावेद खान यांनी नमूद केले.
कोट
नाशिकला दफन ही अफवाच
नाशिकमध्ये त्यांच्या आई, वडिलांची कबर असल्याने आपल्या मृत्यूनंतर तिथेच त्यांच्याजवळच दफन करावे, अशी त्यांची इच्छा असल्याची अफवा प्रदीर्घ काळ होती. मात्र, तसे काहीही नसून त्यांचा दफनविधी सांताक्रुझच्या दफनभूमीतच करण्यात येणार असल्याचेही जावेद खान यांनी नमूद केले.
फोटो
०७जावेद खान