भगवान गायकवाड दिंडोरीदिंडोरी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून कमी होत असलेल्या पर्जन्यमानाने अगोदरच धरणे भरत नसताना व जमिनीची पातळी वर्षागणिक घटत असताना, यंदा जेमतेम पाऊस व त्यातच तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात धरणे आहेत तेथे अत्यल्प पाऊस पडल्याने यंदा सारीच धरणे निम्मीच भरली. त्यामुळे कालव्याचे आवर्तन न सुटल्याने यंदा अभूतपूर्व अशी पाणीटंचाई तालुक्यात निर्माण झाली असून, शेकडो कूपनलिका आटल्या, तर विहिरींनीही तळ गाठला आहे. कधीही पाणीटंचाई न जाणवलेल्या नद्यालगतच्या गावांना यंदा नुसत्या टंचाईच्या झळाच पोहचल्या नाहीत, तर टँकर मागविण्याची वेळ आली असून, टँकरमुक्त ख्याती असलेल्या दिंडोरी तालुक्यातील २२ गावांना टँकर मागणीची वेळ आली आहे. पाच गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर तब्बल ११३ गावे यंदा पाणीटंचाईच्या फेऱ्यात आली असून, त्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. इतर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या दिंडोरी तालुक्याला यंदा प्रथमच तहानलेला राहण्याची वेळ आली आहे.दिंडोरी तालुक्यातील १५५ गावे व पाड्यांना यापूर्वीच विविध योजनांमधून नळपाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या आहेत. गावोगावी असलेल्या शेकडो कूपनलिकांचे पाणी यंदा मात्र प्रथमच आटले आहे, तर फेब्रुवारीतच अनेक विहिरींनी तळ गाठल्याने विविध गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पंचायत समितीतर्फेआॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या तिमाही पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा बनविण्यात आला असून, त्यात मार्चपर्यंत आठ गावांना टँकर देण्याची, तर जूनपर्यंत पुन्हा दहा गावांना टँकर देण्याची वेळ येण्याचा अंदाज बांधला जात आहे. प्राथमिक टप्प्यात ज्या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे तेथे आवश्यक उपाययोजना सुरू झाल्या आहेत. विहिरींचे खोलीकरण, खासगी विहिरींचे अधिग्रहण आदि कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विविध गावांतील नादुरुस्त पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. कूपनलिका खोदण्यात येत आहेत. मात्र अनेक कूपनलिका कोरड्या जात असल्याने मोठी अडचण झाली आहे. टंचाई आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच गावे व एक वाडी येथे उपाययोजना करण्यात आल्या. दुसऱ्या टप्प्यात ६५ गावे व आठ पाडे येथे उपाययोजना करण्यात येत आहे, तर तिसऱ्या टप्प्यात ३३ गावे व एक पाडा येथे उपाययोजना करण्यात येणार आहे. असे यंदा तब्बल एकूण १०३ गावे १० वाड्या-पाडे यांना टंचाईच्या झळा पोहचल्या असून, यात अजून गावांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उर्वरित गावांत मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागत आहे.
दिंडोरी : ११३ गावे टंचाईच्या फेऱ्यात
By admin | Published: May 10, 2016 10:09 PM