दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले होते. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होती. त्यांनी महाले यांचा प्रचंड मताधिक्याने दारूण पराभव करत दणदणीत विजय मिळविला. दिंडोरीवर असलेला भाजपाचा कब्जा टिकवून ठेवला. पवार यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्यातून प्रथमच संसदेत जाण्याची संधी एका महिला उमेदवाराला ग्रामीण जनतेने दिली आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी गुरूवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पुर्ण झाली. दिंडोरी मतदारसंघात दुसऱ्या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या २५व्या फेरीपर्यंत कायम राहिली. सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पवार यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यांच्यासमवेत भाजपाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी १ लाख ९८ हजार ६७९ मतांनी महाले यांना धूळ चारली. पवार यांनी एकूण ५ लाख ६७ हजार ४७० मते मिळवून विजयश्री आपल्या पदरात पाडून घेतला. धनराज महाले यांच्या झोळीत ३ लाख ६८ हजार ६९१ मते तर माकपचे आमदार जीवा पांडू गावीत यांना १ लाख ९ हजार ५७० मते मिळाली.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये नाशिकपेक्षा अधिक ६५ टक्के इतके मतदान दिंडोरीत झाले. गेल्या निवडणूकीत डॉ. भारती पवार यांना२ लाख ९५ हजार १६५ मतं मिळाल्याने त्यांना भाजपाचे हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासमोर पराभव पत्कारावा लागला होता.