दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले आहे. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होत आहे. तसे पाहिले तर भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार यंदा आयात केले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहतो की राष्ट्रवादीचा कब्जा होतो, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुसऱ्या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून सातव्या फेरीत २८ हजार ६२ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात १६ हजार ४५४ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र त्यानंतर ते मोठ्या फरकाने मागे पडले आहेत. पवार यांनी ११ हजार ६०८ मतांनी सातव्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. त्यांना आतापर्यंत १ लाख ८४ हजार ११ मते मिळाली आहे तर महाले यांना १ लाख १२ हजार ६१ मते मिळविली. भारती पवार व महाले यांच्यामध्ये तब्बल एकूण ७१ हजार ९५० मतांचा फरक पडला आहे.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये नाशिकपेक्षा अधिक ६५ टक्के इतके मतदान दिंडोरीत झाले. गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना ५ लाख ४२ हजार ७८४ मतं मिळाली होती, तर डॉ. भारती पवार यांना२ लाख ९५ हजार १६५ मतं मिळाली होती.