गेल्या अनेक दिवसांपासून शहरात आधार कार्ड केंद्र बंद आहे. नेमके आधार केंद्र कुठे सुरू आहे त्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना वणवण फिरावे लागते. अनेकदा चुकीची माहिती मिळत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या कामावर होतो. त्यामुळे दिवस, पैसा, वेळ वाया जात आहे. अनेकदा नागरिकांना आधार कार्डसाठी पिंपळणारे, उमराळे, मोहाडी, खेडगाव आदी भागांत जावे लागत आहे. सध्या पीएफला आधार जोडणी नसल्यास पीएफ खाते बंद झाले आहे ते सुरू करण्यासाठी आधार अपडेट असणे गरजेचे आहे. तसेच विविध बँक खाते व सरकारी कामांत आधार अपडेट आवश्यक असल्याने नागरिकांना दिंडोरी तालुक्याचे ठिकाण असून आधार केंद्र नसल्याने गैरसोय होत आहे.
नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी, कामगारांना पीएफसाठी आधार अपडेट आवश्यक आहे, मात्र शहरात आधार केंद्र सुरू नसल्याने गैरसोय होत आहे. शहरात कायमस्वरूपी आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी केली आहे.