विजय मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वाहनांचा वाढलेला वेग, वाढती संख्या व त्यातच पूर्वी दुहेरी असलेले राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणात झालेले रूपांतर यामुळे गत काही वर्षांमध्ये नाशिक परीक्षेत्रातील महामार्गावरील अपघाताचा आलेख चढता होता़ मात्र २०१५ व २०१६ या वर्षातील अपघात व त्यातील मयत व जखमी यांच्या आकडेवारीचा तौलनिक अभ्यास केला असता या अपघातांमध्ये अल्पशी घट झाल्याचे समोर आले आहे़ अर्थात ही समाधानाची बाब असली तरी यामध्ये आणखी सुधारणा कशी घडवून आणता येईल, याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे़ नाशिक परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांतील घोटी, पिंपळगाव, मालेगाव, धुळे, शिरपूर, पाळधी, चाळीसगाव, विसरवाडी व सिन्नर येथून राष्ट्रीय व राज्य महामार्ग आहे़ या चार जिल्ह्यांमधील महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये दरवर्षी सरासरी १५० नागरिक मृत्युमुखी पडतात, तर यावर्षीचा जानेवारी ते मार्च २०१७ या तीन महिन्यांच्या कालावधीत १५३ अपघात झाले असून, त्यामध्ये ६० लोकांचा मृत्यू झाला आहे़
राज्यात दरवर्षी होणाऱ्या महामार्गावरील अपघातांमध्ये १२ हजार नागरिकांचा मृत्यू होतो़अतिवेगवान वाहने, लेन कटिंग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, रॅश ड्रायव्हिंग, महामार्गालगतच्या गावांजवळील पंचर वा रोड क्रॉसिंग, रस्त्यात उभी असलेली नादुरुस्त वाहने, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न वापरणे याबरोबरच मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे या कारणांमुळे महामार्गांवरील अपघातांची संख्या वाढते़, तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार महामार्गापासून ५०० मीटरच्या आतील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले असून, याचा परिणाम लवकरच बघावयास मिळणार आहे़नाशिक विभागातील नाशिकसह, धुळे, जळगाव, नंदुरबार या चार जिल्ह्यांतील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१६ या वर्षात ३२५ अपघात झाले आहेत. यामध्ये १२४ जणांचा मृत्यू झाला असून, ५८६ जण गंभीर जखमी झाले आहेत. २०१५ मध्ये ३६३ अपघात झाले आहेत. यामध्ये १३० जणांचा मृत्यू झाला असून, ५९९ गंभीर जखमी झाले होते़ २०१५च्या तुलनेत २०१६ मधील अपघातांमध्ये घट दिसत असली तरी चालू वर्षी अवघ्या तीन महिन्यांत नाशिक विभागात १५३ अपघात झाले असून, यामध्ये ६० जणांचा मृत्यू, तर १९९ जण जखमी झाले आहेत.